पावसाने दांडी मारल्याने तुरीच्या उत्पादनावर परिणाम !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २२ नोव्हेबर २०२३

पावसाळ्याच्या दिवसात अनेक भागात पावसाचा खंड पडल्याने वाढीच्या काळातच पावसाने मारलेली दांडी व ऑक्टोबर महिन्यातील उष्म्यासह परतीच्या पावसाने मारलेली चाट यामुळे तुरीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादनाची सरासरी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात सव्वालाख हेक्टरमध्ये तुरीची पेरणी यंदाच्या खरीप हंगामात झाली आहे. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून तुरीची शेतकरी आंतरमशागतही करतात. परतीचा पाऊस न आल्याने पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी पिकांची स्थिती खराब होत असून फुले गळू लागली आहेत. काळ्या कसदार जमिनीवरील तूर बरी असली तरी हलक्या मुरमाड व मध्यम जमिनीवरील तूर पिकांत फूलगळ सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उत्पादनाची सरासरी घसरण्याच्या शक्यतेने त्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे. सध्या तुरीला बाजारात हमीदरापेक्षा अधिक भाव आहे. साडेअकरा हजारांवर भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. या हंगामातही भाव चढे राहतील, अशी शक्यता खरेदीदारांनी वर्तविली आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादनाची सरासरी मिळणे आवश्यक आहे. थंडीचा जोर अद्यापही हवा तसा वाढलेला नाही. रात्री थोडी थंडी राहत असली तरी दिवसा मात्र तापमानात वाढ असल्याने उष्मा वाढला आहे.

 

बातमी शेअर करा
#rain
Comments (0)
Add Comment