तब्बल १७६.९२ कोटी रुपये दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात जमा!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ एप्रिल २०२४ | दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात दूध अनुदानाचे १७६.९२ कोटी रुपये जमा झाले आहेत. दुधाला मिळणाऱ्या कमी भावामुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या प्रति लिटर ५ रुपये अनुदानाचा लाभ आतापर्यंत १७६ कोटी ९२ लाख रुपये इतका २ लाख ७२ हजारांवर शेतकर्‍यांपर्यंत पोहोचला आहे.

सुरुवातीला एका महिन्यासाठी असलेले हे अनुदान नंतर दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आले आहे. त्यानुसार, ११ जानेवारी २०२४ ते १० मार्च २०२४ या कालावधीसाठी शेतकर्‍यांना हे अनुदान मिळणार आहे.

दुग्ध व्यवसायातील अडचणींवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांकडून अनुदानाची मागणी होत होती. त्याप्रमाणे, ५ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने सहकारी संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकर्‍यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. सदर योजनेची अंमल बजावणी महाराष्ट्रात यशस्वीरित्या सुरू आहे.

महाराष्ट्रातील २७९ सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांनी अनुदानासाठी अर्ज केले होते. यापैकी २३५ प्रकल्पांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी पूर्ण केल्यामुळे, या प्रकल्पांमध्ये दूध पुरवठा करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले.

paid add

प्रत्येक शेतकर्‍याच्या गायींना टॅगिंग करण्यात आले असून त्यानुसार दहा लाख १८ हजार ८५६ गाईंनी पस्तीस कोटी ३८ लाख ४९ हजार ६१८ लिटर दूध पुरवठा केला आहे. अनुदान वेळे वर मिळेल यासाठी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि सहकार विभागांनी संयुक्तपणे या योजनेची अंमलबजावणी केली.

योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी, प्राप्त अर्जाची छाननी करून जिल्हा नियोजन समिती आणि सहकारी व खासगी प्रकल्पांना माहिती भरण्यासाठी लॉगिन आणि युजर आयडी उपलब्ध करून देण्यात आले. हे नियोजन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

राज्य सरकारने दिलेल्या ५ रुपये प्रति लिटर अनुदानामुळे दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यामुळे त्यांना मिळणाऱ्या दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यात, उर्वरित पात्र शेतकर्‍यांपर्यंत अनुदानाची रक्कम पोहोचवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम