सोलापूर जिल्हा दूध संघात ४६ हजार लिटर दूध संकलन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (दूध पंढरी) दूध संकलनात वरचेवर वाढ होत आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला दूध संघ यामुळे सावरण्याच्या स्थितीत आहे. सहा महिन्यांपूर्वी रोज केवळ १८ हजार लिटर संकलन असणाऱ्या संघाकडे आता जवळपास रोज ४६ हजार लिटरपर्यंतचे दूध संकलन होत असल्याची माहिती .जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील बहुतेक सर्व केंद्रांवर संकलन वाढले आहे. त्याशिवाय नव्याने सात मार्गही सुरू करण्यात आले आहेत. आपण पदभार घेतल्यापासून जाणीवपूर्वक दूध संकलनात वाढ करण्यावर भर दिला. तसेच प्रत्येक संचालकांना त्यांच्या भागातून किमान २००० लिटर दूध संकलन वाढ करण्यासाठी सुचवले.

त्याशिवाय ‘गाव तेथे दूध डेअरी’ हा आमचा संकल्प आहे. त्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय दूध तपासणीसाठी अद्ययावत यंत्रणा, दुधाच्या गुणवत्तेनुसार दर आणि दर दहा दिवसांना दुधाचे पेमेंट द्यायला सुरुवात केली आहे. तसेच दुधाच्या गुणवत्तेत कोणताही मानवी हस्तक्षेप ठेवला नाही. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक केल्याने आणि रोखीने व्यवहार होत असल्याने दूध उत्पादकांची विश्‍वासार्हता वाढली आहे. या सगळ्याचा परिणाम संकलनातील ही वाढ आहे.’’
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक केगावच्या संकलन शीतकरण केंद्रावर ११ हजार ८०० लिटर, त्यानंतर पंढरपुरात ८२०० लिटर, टेंभुर्णीत ८००० लिटर, सांगोल्यात १८०० लिटर, मोहोळला ६८०० लिटर, मंगळवेढ्यात ५४०० लिटर असे संकलन आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम