विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत एका खासगी कंपनीच्या कापूस बियाण्यांची कमतरता जाणवत असून, शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अकोला, अमरावती, अकोट आणि विदर्भातील इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या गोंधळामुळे बियाणे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलन केले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, एका विशिष्ट वाणाची मागणी खूपच जास्त असल्याने बाजारात त्या वाणाची टंचाई निर्माण झाली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना इतर बीटी बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे, कारण तेही चांगले उत्पादन देतात.
महाराष्ट्रात कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ४०.२० लाख हेक्टर आहे आणि यासाठी १ कोटी ७० लाख पाकिटे बियाण्याची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतल्यास १.७५ कोटी पाकिटे उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कापूस बियाण्याची कमतरता नाही.
इतर बियाणेही चांगले
शेतकऱ्यांनी एकाच वाणावर अवलंबून न राहता इतर कंपन्यांच्या बियाण्यांचाही वापर करावा, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. केंद्र सरकारने खरीप २०२४ साठी कापूस BG II चा दर ८६४ रुपये निश्चित केला आहे. जादा दराने बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
कारवाईची स्थिती
जळगाव, धुळे, आणि छत्रपती संभाजीनगर येथे जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, आणि यवतमाळ येथेही कारवाई करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात बियाणे साठा जप्त करण्यात आला आहे.
कृषी विभागाने दोषी विक्रेत्यांवर तातडीने कारवाई केली असून, सर्व जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पथकांद्वारे तपासणी मोहीम राबवली आहे. शेतकऱ्यांनी इतर बियाण्यांचा वापर करून आपले उत्पादन वाढवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम