सध्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सोमठाण जोश या गावात भीषण पाणीटंचाईने थैमान घातले आहे. ५००-६०० घरांच्या आणि सुमारे १५०० लोकसंख्येच्या या गावात दर तीन दिवसांनी फक्त एकच टँकर पाणी येते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या गावातील नागरिकांना पाण्यासाठी घराबाहेर जावं लागतं, त्यामुळे लहान मुलांवर घरातील पाण्याची जबाबदारी येते.
टँकर आल्यानंतर पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होते. काहींना पाणी मिळतं, तर काहींना नाही. अशा वेळी गावातील एकमेव सरकारी विहीर हा ग्रामस्थांचा आधार बनला आहे.
लहान मुलं देखील विहिरीवर जाऊन पाणी आणतात, ज्यामध्ये त्यांना जीवघेणा खेळ खेळावा लागतो. मागील तीन महिन्यांपासून या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या नितिन राठोड या नववीतील विद्यार्थ्याने सांगितलं की, “आई-वडील मोलमजुरी करतात, मी एकटा आहे. आई-वडील येईपर्यंत टाकीभर पाणी भरावं लागतं. विहिरीवर गर्दी वाढली की पाणी संपतं, मग सकाळी लवकर किंवा दुपारी पाणी आणावं लागतं.”
राजापूर ग्रुप ग्रामपंचायत या गावाचा कारभार पाहते, परंतु लहान गाव असल्याने त्यांच्या समस्यांकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. “हे पाणी पिऊन अनेकांना जुलाब आणि उलटी होते. पण दुसरा पर्याय नसल्याने आम्ही पाणी गरम करून पितो,” असे मनोज चव्हाण यांनी सांगितले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम