राज्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत आणि सर्वत्र मान्सूनची आतुरता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात ७ जूननंतर पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, १ आणि २ जून रोजी मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस
मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत १ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर २ जून रोजी नांदेडसह लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेच्या पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
मराठवाड्यात तापमानात घट
मागील आठवड्याच्या तुलनेत मराठवाड्यात तापमान १ ते २ अंशांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि पुढील काही दिवसांत तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या ३७ ते ४१ अंश सेल्सियस तापमान नोंदले जात असून, उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात नुकसान
गेल्या दोन दिवसांत मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या ४८ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २४.३ हेक्टर जमिनीवर पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पावसामुळे ५३ जनावरे देखील दगावल्याचे पीटीआयने सांगितले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम