नागपूर: राज्यातील काही भागातील शेतकरी कापसाच्या विशिष्ट वाणाबाबत आग्रही असल्याने त्या वाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तांत्रिक कारणांमुळे देशभरात कापसाच्या बियाण्यांचे उत्पादन घटले आहे. वापर व मागणीत दीड ते दुपटीने वाढ झाली आहे. तरीही महाराष्ट्रात पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी चिंता न करता सक्षम पर्यायी वाणांचा शोध घेणे आवश्यक आहे.
देशभरातील बियाणे उत्पादक कंपन्या, विशेषतः गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीने कापसाचे सीड प्लॉट घेतात. तयार केलेले बियाणे तीन वर्षे वापरले जाते. २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या खरीप हंगामात अतिपाऊस, दमट वातावरण, बाेंडसड व गुलाबी बाेंडअळीमुळे बियाणे उत्पादन घटले आहे. मात्र, दर्जेदार बियाणे बाजारात उपलब्ध आहेत. या काळात बियाण्यांच्या सेल रिटर्नचे प्रमाण ४०% वरून २५-३०% वर आले आहे.
अलीकडे शेतकरी प्रतिएकर तीन पाकिटे बियाणे वापरतात. सघन पद्धतीने कापसाची लागवड करणारे शेतकरी प्रतिएकर चार ते सहा पाकिटे वापरतात, त्यामुळे बियाण्याचा वापर व मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत बियाण्यांचा तुटवडा नाही, पुरेसे बियाणे उपलब्ध आहे.
महाराष्ट्रात ५५ ते ६० कंपन्या कापसाचे बियाणे उपलब्ध करून देतात. राज्यातील सरासरी मागणी १ कोटी ६० लाख पाकिटे असून, १ कोटी ७३ लाख पाकिटे पुरवठ्याचा प्लान राज्याच्या कृषी विभागाला दिला आहे. यातील १ कोटी ३१ लाख पाकिटे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत व उर्वरित बियाणे २ ते ५ जूनदरम्यान बाजारात येणार आहे.
विशिष्ट वाण विदर्भातील खारपाणपट्ट्यात सर्वाधिक वापरले जाते कारण त्याच्या पानांवर बारीक काटेरी लव असल्याने ते रस शोषण करणाऱ्या किडींना बळी पडत नाहीत. उत्पादन खर्च कमी असल्याने ते वाण लोकप्रिय आहे. या वाणाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी वाणांचा शोध घ्यावा व पेरणीसाठी सज्ज व्हावे.
– दिलीप ठाकरे, कापूस उत्पादक तथा सदस्य एमसीएक्स काॅटन (पीसीए)
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम