सल्ला : रब्बी पिकांची कशी काळजी घ्यायची?

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ | सद्य हवामान स्थिती पाहता, राज्यातील अनेक भागात थंडी, ढगाळ हवामान, आहे. अशा स्थितीत रब्बी पिकांची कशी काळजी घ्यायची? याबाबतची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

१) हरभरा : जोमदार वाढीसाठी हरभरा पिक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली कोळपणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) करडई : पिकात उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करावी व दोन रोपातील अंतर 20 सेंमी ठेवावे. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्याव. हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा यांच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा बायोमिक्स 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह फवारणी करावी.

३) हळद : हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

४) ऊस : पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26 किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम