गाजराची लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ८ डिसेंबर २०२२ I राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गाजराची लागवड केली जाते. गाजराची वाढ व्यवस्थित होण्याकरिता लागवडीसाठी निवडलेली जमीन मऊ, भुसभुशीत, मध्यम ते खोल, भुसभुशीत, गाळाची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. जमिनीची आम्ल-विम्लता 6.5 असल्यास पिकाची वाढ उत्तमरीत्या होते. गाजराच्या जातींचे युरोपीय आणि आशियायी असे दोन गट पडतात.
युरोपीय जाती

या जातीच्या गाजरांचा रंग केशरी आणि आकार सारख्या जाडीचा असतो यामध्ये टेज, चॅनी, पुसा, जमदग्नी इत्यादी जातींचा समावेश होतो.
आशियायी जाती

या जातींच्या गाजरांचा रंग तांबडा असतो. फळे चवीला गोड आणि रसाळ असतात. युरोपीय आणि आशियायी जातींचा संकर करून पुसा केसर, पुसा मेघाली या जाती भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आल्या आहेत.

खरीप, तसेच रब्बी हंगामात गाजराची लागवड करतात; परंतु रब्बी हंगामातील गाजरे जास्त गोड आणि उत्तम दर्जाची असतात. लागवड हाताने बी फोकून किंवा पाभरीने करताना दोन ओळींत 30 ते 45 सें.मी. अंतर ठेवावे. नंतर विरळणी करून दोन रोपांतील अंतर आठ सें.मी. ठेवावे. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे चार ते सहा किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्यात भिजत ठेवल्यास बियांचा रुजवा लवकर होतो.

जमिनीच्या सुपीकतेनुसार आणि माती परीक्षणानुसार मशागतीच्या वेळी हेक्‍टरी 20 ते 25 टन शेणखत मातीत मिसळून घ्यावे. त्यानंतर दर हेक्‍टरी 80 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी, तर नत्राची उरलेली अर्धी मात्रा लागवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी. बियाण्याची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर हिवाळ्यात सात ते आठ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. गाजर काढण्यापूर्वी 15 दिवस पाणी देणे बंद करावे, म्हणजे गाजरात गोडी निर्माण होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम