कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात, शिफारशीपेक्षाही जास्त होऊ लागला आहे. मात्र यामुळे शेतीच आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. शेतीच हे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वेळच्यावेळी आपल्या शेतीतल्या मातीचे आणि पाण्याचे परीक्षण करणे आवश्यक असते.
माती परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या शेतातील मातीपरीक्षणाच्या माध्यमातून जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म समजून घेतल्यानंतर त्यातील पिकांना उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण शोधून काढणेआणि त्यानुसार आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खतांचा पुरवठा एकात्मिक पद्धतीने जमिनीस केल्यास जमिनीचे आरोग्य टिकविण्याबरोबर खतांच्या वापरात आणि खर्चात बचत होऊन पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. तसेच, जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास त्यावर योग्य उपाय शोधणे. मातीपरीक्षण केल्यामुळे आपल्या शेतीची अन्नद्रव्याची नेमकी गरज शेतकऱ्याला लक्षात येऊ शकते.
जमिनीची आरोग्यासाठी आवश्यक अन्नघटक –
मुख्य अन्नघटक : हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश
दुय्यम अन्नघटक : कॅल्शिअम, मॅग्नेशियम, गंधक
सूक्ष्म अन्नघटक : लोह, मेंगनीज, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोराॅन, क्लोरिन
जागा कशी निवडावी –
वर्षभरात नमुने कधीही काढता येतात.तथापि, पाऊस झाल्यावर, पाणी दिल्यानंतर, वाफसा नसतांना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुने काढू नयेत. पिकास रासायनिक खते दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत संबंधित जमिनीतून माती नमुना घेऊ नये.
जमिनीत पिक घेण्याच्या हंगामापूर्वी नमुने घेणे अधिक योग्य आहे. फळझाडांची लागवड करायची असेल तर एप्रिल-मे महिन्यात मातीचे नमुने घ्यावेत.
मातीचा नमुना घेताना खालील जागा सोडाव्यात –
शेतामधील खते साठविण्याची जागा
कचरा टाकण्याची जागा
पाण्याच्या पाटाजवळील जागा
विहिरीजवळील जागा
जनावरे बसण्याच्या जागा
दलदलीची-पाणथळ जागा
झाडाखालील जागा
माती वाहुन गेलेल्या जागा
ठिबक सिंचन असल्यास वेटिंग बोलच्या कडेच्या जागा
जुने बांध
माती नमुना घेण्याची पद्धत –
शेतातील नमुना योग्य पद्धतीने घेणे हि माती परीक्षण कार्यक्रमात सर्वात महत्त्वाची बाब आहे.
नमुना काढण्यासाठी शेतात गेल्यानंतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. हे विभाग पाडताना जमिनीची रंग, खोली, पोत, उंच-सखलपणा, पाणथळ किंवा टोपण जागा इ., बाबींचा विचार करावा. अशा प्रकारे विभागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.
मातीचा नमुना प्रातिनिधिक असणे जरूरीचे आहे. एका एकरमधून ८ ते १० ठिकाणची माती घ्यावी, मातीचा नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी इंग्रजी (व्ही) आकाराचा खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा.या खड्ड्याची खोली पीकनिहाय खालीलप्रमाणे वेगवेगळी असते.
केळी, द्राक्षे, डाळिंब, उस, कापूस – २० ते २५ सेंमी खोलीपर्यंत
भाजीपाला वेलवर्गीय पिके – १० ते १५ सेंमी खोलीपर्यंत
फळझाडे – ६० ते १०० सेंमी खोलीपर्यंत
वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी आणि सदरमाती नमुन्याविषयीची माहिती एका कागदावर लिहून तो कागद पिशवीत टाकून मातीपरीक्षण प्रयोगशाळेत पाठवावी.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम