ब्रोकोली लागवडीतून मिळवा चांगला नफा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | ब्रोकोली या परदेशी भाजीपाला पिकाचे शास्त्रिय नाव ‘ब्रासिका ओलेरेसिया व्हरा. इटालिका’ असे आहे. ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी, फ्लॉवर यांचे कूळ, जाती आणि प्रजाती एकच आहेत. या भाजीचे मूळस्थान इटली हेच आहे.

 

जगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी असून त्या खालोखाल स्पेन, मेक्‍सिको, इटली, फ्रान्स, अमेरिका, पोलंड, पाकिस्तान, इजिप्त आदी देशांचा क्रमांक लागतो. भारतात ब्रोकोलीची लागवड हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्‍मीर, नीलगिरी हिल्स, उत्तर मैदानी प्रदेश आणि महाराष्ट्र आदी ठिकाणी होते. ही ब्रोकोली मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकता येथील हॉटेल्ससाठी पाठविली जाते.
महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रावर केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत ती विक्रीसाठी पाठविली जाते.

हवामान :

ब्रोकोलीचे उत्पादन थंड हवामानात अतिशय उत्तम प्रकारे घेता येते. हिवाळी हंगामात लागवड फायदेशीर असते. ज्या भागात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणीही लागवड करता येते. महाराष्ट्रातील पाचगणी, महाबळेश्‍वर, प्रतापगड आदी भागांत उन्हाळ्यातही लागवड यशस्वी होते. दिवसा २० ते २५ अंश से. तापमान रोपांची वाढ होण्यासाठी आवश्‍यक असून, गड्डा तयार होतेवेळी तापमान १५ ते २० अंश से. असणे जरुरीचे आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यास तयार झालेला गड्डा घट्ट राहत नाही.
हरितगृहामध्ये वर्षभर लागवड करण्यासाठी, हरितगृहात रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी दिवसाचे तापमान २० ते २५ अंश निश्‍चित करावे. सापेक्ष आर्द्रता ७० टक्के नियंत्रित करावी. गड्डे लागणीच्या वेळेस रात्रीचे व दिवसाचे तापमान अनुक्रमे १५ ते २० अंश, तर ७० टक्के सापेक्ष आर्द्रता नियंत्रित करावी.

 

जमीन :
चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी, मध्यम रेतीमिश्रित जमीन लागवडीसाठी अतिशय चांगली असते. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा. जमिनीची पूर्वमशागत करण्यासाठी जमीन ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने उभी- आडवी नांगरून (अंदाजे ४० सें.मी. खोल) ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी वेळी एकरी १२ ते १५ मे. टन. चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून टाकावे.
हरितगृहामध्ये लागवड करण्यासाठी हरितगृहातील तयार केलेले माध्यम फॉरमॅलिन या रसायनाद्वारे निर्जंतूक करावे. त्यानंतर ६० सें.मी. रुंद, ३० सें.मी. उंच व दोन गादीवाफ्यांमध्ये ४० सें.मी. अंतर ठेवावे. हरितगृहामध्ये एकरी ४० मीटर लांबीचे एकूण १०० गादी वाफे तयार होतात.

रोपे तयार करणे :
गादी वाफे पद्धत – गादी वाफ्यावर बी पेरून रोपे तयार करून लागवड करतात. गादी वाफे एक मी. रुंद, २० सें.मी. उंच, १० मी. लांब आकाराचे तयार करण्यासाठी प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करून घ्यावी.
प्रत्येक गादी वाफ्यात अंदाजे १० ते १५ किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे. शिफारस केलेले कीटकनाशकही मातीत मिसळावे. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर पाच सें.मी. अंतरावर दोन सें.मी. खोलीच्या रेषा आखून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात बियांची पेरणी करावी. बारीक गाळलेल्या शेणखताने बी झाकून घ्यावे.
बी पेरलेल्या गादी वाफ्यांवर पाणी दिल्यानंतर प्लॅस्टिक पेपरने झाकून घ्यावे. बियांची उगवण सुरू झालेली दिसताच वाफ्यांवरून प्लॅस्टिक पेपर काढून टाकावा. बी सहा ते सात दिवसांत उगविलेल्या दिसतात. एकरी लागवडीसाठी संकरित जातीचे बियाणे १२५ ग्रॅम लागते.
रोपवाटिकेत रोपांच्या वाढीच्या काळात तापमान २० ते २२ अंश से. असणे आवश्‍यक आहे, म्हणजे बियांची उगवण व रोपांची वाढ व्यवस्थित होईल. रोपवाटिकेस पाणी देताना कॅल्शिअम नायट्रेट व पोटॅशियम नायट्रेट यांचे मिश्रण प्रत्येकी एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने द्यावे. रोग- किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस असलेल्या कीडनाशकांची फवारणी करावी.

प्लॅस्टिक ट्रेमध्ये रोपेनिर्मिती – या पद्धतीत ट्रेमध्ये कोकोपीट माध्यम भरून बी टाकावे. वरीलप्रमाणेच ट्रेमधील बी उगवून आल्यावर रोपांची काळजी घ्यावी. पुनर्लागवडीसाठी रोपे २०-२५ दिवसांत तयार होतात. म्हणजे रोपांना ५-६ पाने असून रोपांची उंची १२ ते १५ सें.मी. असते.

 

सुधारित जाती :
ब्रोकोली पिकात हिरवे गड्डे, जांभळे गड्डे, फिकट हिरवे गड्डे आणि पांढऱ्या रंगाचे गड्डे असे प्रकार आहेत. मात्र, अमेरिका आणि युरोपीय भागांत, तसेच भारतात हिरव्या गडद रंगाच्या गड्ड्यांचे वाणच अधिक लोकप्रिय झाले आहेत. याच रंगाच्या संकरित वाणांची लागवड होत आहे.
जांभळ्या रंगाचे वाण कडाक्‍याची थंडी सहन करू शकतात आणि ऐन हिवाळ्यात काढणीस येतात. हा प्रकारसुद्धा हिरव्या वाणाबरोबर लावावा. सॅलडमध्ये जास्त प्रमाणात याचा उपयोग होईल. बाजारपेठेत गड्ड्यांना गडद हिरवा रंग, बारीक फुलोरायुक्त मुलायम, घट्ट फूल असणाऱ्या वाणांना चांगली मागणी आहे. बियाणे विकत घेताना त्याचे उत्पादन, पीक किती दिवसांत काढणीस तयार होते आदी सर्व गोष्टींची माहिती घ्यावी.
महाराष्ट्रात लागवडीसाठी ‘पालम समृद्धी’ हा वाण चांगला असून तो जास्त उत्पादन देणारा आहे. त्याचा मुख्य गड्डा ३०० ते ४०० ग्रॅमचा असून, तो हिरव्या रंगाचा व घट्ट असतो. पुसा केटीएस-१ या मध्यम उंचीच्या वाणाचे गड्डे अतिशय घट्ट व गडद हिरव्या रंगाचे असतात.

 

लागवड :
उच्च प्रतीचे गड्डे, जास्त उत्पादन, गड्ड्यांचा आकार एकसमान मिळण्यासाठी रोपांची पुनर्लागवड गादी वाफ्यावर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर करावी. एकरी सुमारे २६,६६० इतकी रोपे बसतात. लागवड दुपारनंतर करावी. त्यानंतर रोपांना ठिबकद्वारे पाणी द्यावे. लागवडीपूर्वी रोपे शिफारस केलेल्या कीटकनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. हरितगृहांमध्ये लागवड प्रत्येक गादीवाफ्यावर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर करावी.

 

पाणी व्यवस्थापन :
पिकाला ठिबक पद्धतीने किती व कशा प्रकारे पाणी द्यावे ही बाब महत्त्वाची आहे. पिकाला दररोज किती लिटर पाण्याची संभाव्य गरज आहे हे प्रथम निश्‍चित करून दररोज पाणी देण्याचा कार्यक्रम निश्‍चित करावा.

 

खत व्यवस्थापन :
सर्वप्रथम माती परीक्षण करून जमिनीतील उपलब्ध मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती घ्यावी. त्यानुसार खत व्यवस्थापन करावे. एकरी ६० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ७० किलो पालाश देणे आवश्‍यक आहे. खतांचे पीकवाढीनुसारचे टप्पे शिफारशीनुसार द्यावेत. मुख्य गड्ड्यांची काढणी झाल्यावर पानांच्या बेचक्‍यांतून येणाऱ्या गड्ड्यांची वाढ होण्यासाठी एकरी ३० किलो नत्र द्यावे.
माती परीक्षण अहवालाप्रमाणे मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून द्यावीत. लागवडीपासून अंदाजे २५-३० दिवसांनी या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास झाडाची खोडे पोकळ झालेली आढळून येतात. तसेच, गड्डा काढणीस तयार झालेल्या अवस्थेत गड्डा कापला असता लहान खोडे पोकळ झाल्याचे आढळून येते.
गड्ड्याचा हिरवा रंग फिकट होत जातो. गड्ड्यावर भुरकट रंगाचे डाग पडतात. अशा प्रकारच्या गड्ड्यांना बाजारात भाव मिळत नाही. बोरॉनची कमतरता असल्यास खोड पोकळ होणे आणि गड्ड्यांचा हिरवा रंग फिकट होणे ही लक्षणे आढळून येतात. उपाय म्हणून लागवडीनंतर २५-३० दिवसांनी एकरी चार किलो बोरेक्‍स (सोडियम टेट्रा बोरेट) जमिनीतून द्यावे.
लागवडीनंतर ६० दिवसांनी पुन्हा चार किलो बोरेक्‍स जमिनीतून द्यावे. ब्रोक्रोली पानांच्या झाडांचा शेंडा खुरटलेला राहणे व गड्डा न भरणे ही मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. विशेषतः आम्लीय जमिनीत (सामू ५.५ च्या खाली) ही विकृती दिसून येते. उपायासाठी एकरी १.६ कि.ग्रॅ. अमोनियम किंवा सोडियम मॉलीब्डेट्‌ जमिनीत मिसळून द्यावे.

ठिबकद्वारे खत व्यवस्थापन – उच्च प्रतीचे गड्डे, जास्त उत्पादन मिळण्यासाठी खतांच्या मात्रा विद्राव्य खतांच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे पाण्याबरोबर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार देता येतात. प्रत्येक खताचे द्रावण देण्यापूर्वी द्रावणाचा व पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा. तसेच, पाण्याची विद्युतधारकता एकपेक्षा कमी असेल याची काळजी घ्यावी. सामूचे प्रमाण निश्‍चित करण्यासाठी नायट्रिक आम्लाचा उपयोग करावा.

 

आंतरमशागत :
पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी वाफ्यावरील गवत- तण काढून माती ३-४ सें.मी. खोलीपर्यंत खुरप्याने हलवून घ्यावी. माती हलविताना रोपांना मातीचा आधार द्यावा. पुन्हा २०-२५ दिवसांनी खुरपणी करून वाफे तणमुक्त व स्वच्छ ठेवावेत. हरितगृहातील व खुल्या क्षेत्रात गादी वाफ्यावर केलेल्या लागवडीसाठी लागवडीपूर्वी प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन फायदेशीर ठरते, त्यामुळे तणांची वाढ होण्यास प्रतिबंध होतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. झाडांची वाढ व उत्पादन समाधानकारक मिळून उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात.

 

काढणी व उत्पादन :
वाणपरत्वे ब्रोकोलीचा गड्डा ६० ते ७० दिवसांत लागवडीपासून काढणीस तयार होतो. विक्रीच्या दृष्टीने व चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने गड्ड्यांचा व्यास ८ ते १५ सें.मी. असतानाच काढणी करावी. गड्डा घट्ट असताना त्यातील कळ्यांचे फुलात रूपांतर होण्यापूर्वीच काढणी करणे महत्त्वाचे. अशा गड्ड्यांची प्रत अतिशय चांगली असून, या अवस्थेत गड्ड्यातील फुले उमलत नाहीत. काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी.
तयार गड्डे साधारणपणे १५ सें.मी. लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत. मुख्य गड्डा काढून घेतल्यानंतर खाली पानांच्या बेचक्‍यांतून येणारे गड्डे पोसण्यास वाव मिळतो. प्रत्येक गड्ड्याचे वजन सरासरी ३०० ते ४०० ग्रॅम असणे आवश्‍यक आहे. एकरी ४० गुंठे क्षेत्रातून सुमारे ८ ते ९ टनांपर्यंत गड्ड्यांचे उत्पादन मिळते.
पारंपरिक लागवड पद्धतीपेक्षा गादी वाफ्यावर लागवड, ठिबक सिंचन तसेच त्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर केल्यास चांगल्या प्रतीचे गड्डे काढणीस मिळतात.

आकारमान किंवा वजनाप्रमाणे प्रतवारी करून गड्डे स्वच्छ करावेत. वायुविजनासाठी छिद्रे असलेल्या कोरूगेटेड बॉक्‍समध्ये ते ३ किंवा ४ थरांपर्यंत भरावेत. पॅकिंग केलेल्या बॉक्‍सेसची रात्री (तापमान कमी असल्याने) वाहतूक करावी किंवा प्लॅस्टिक ट्रेमध्ये सभोवती बर्फ ठेवून तापमान कमी करून क्रेटमधून वाहतूक करावी.
पॅकिंग बॉक्‍सेसमधील तापमान वाढल्यास गड्ड्यांचा हिरवा रंग फिकट पिवळसर होऊन गड्ड्यांची प्रत कमी होते.

 

इतर देशांमध्ये ब्रोकोली गड्ड्यांचे व देठांचे बारीक तुकडे इतर भाज्यांमध्ये मिसळून ‘सॅलड’ म्हणून कच्च्या स्वरूपात वापरतात. ब्रोकोलीचे तुकडे ऑलिव्ह तेल किंवा बटरमध्ये ‘फ्राय’ करून आहारात वापरतात. ब्रोकोली गड्ड्याचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून वापर करतात. सूपही तयार केले जाते. भारतात मुख्यत्वे करून ब्रोकोलीचा हिरवे सॅलड या स्वरूपात आहारात उपयोग करतात. त्याचप्रमाणे ब्रोकोलीपासून पराठा, सूप तयार केले जाते. ब्रोकोलीत पाणी, कॅलरीज, कर्बोदके, साखर, तंतूमय तसेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे व विविध खनिजे असतात. ब्रोकोलीच्या गड्ड्यांत महत्त्वाची अँटी-ऑक्‍सिडंट्‌स असतात. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग रोखणे शक्‍य होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम