आल्याचे बेणे साठवण

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ |आल्याची लागवड बेण्यापासून कंदापासून करतात, कारण बियापासून लागवड करता येत नाही. आल्याचे भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी बेणे निरोगी असावे लागते. साठवणुकीत बेण्याचे नुकसान होऊ नये म्हणून निरोगी प्लॉटमधून आल्याचे पुर्ण पक्क झालेले कंद निवडावेत.

बेणे साठवण्याच्या पद्धती :

सामान्यपणे शेतकरी खोलीच्या कोपर्‍यात किंवा छ्प्परात तळाशी वाळूचा पातळ थर देऊन त्यावर बेण्याचा ढीग करतात आणि तो ढीग वाळलेल्या पानांनी झाकतात. काही शेतकरी मोठ्या झाडाच्या सावलीत खड्डा करून त्यात बेणे साठवतात. काही शेतकरी आल्याची काढणी करण्याचे वेळी शेताचा काही भाग काडणी न करताच सोडतात महणजे त्या भागातील आल्याचे कंद काढत नाहीत. पुढील हंगामात लागवडीच्या आधी हे कंद काढून बेण्यासाठी वापरतात. काही शेतकरी बेणे साठविण्यापूर्वी शेणकाल्यात बुडवून काढतात.

बेण्याच्या आकारमानाप्रमाणे जमिनीत आवश्यक लांबीचा व रुंदीचा खड्डा खणावा. त्याची खोली मात्र ६० सेंमी ठेवावी. ४५ x ४५ x ६० सेंमी आकाराच्या खड्ड्यात २० ते २५ किलो बेणे साठविता येते. खड्ड्याच्या भिंती व तळ शेण व मातीच्या मिश्रणाने सारावाव्यात. त्याप्रमाणे तयार झालेला खड्डा १० ते १५ दिवस वाळू द्यावा.

खड्ड्याच्या तळावर कोरड्या वाळूचा २ सेंमी जाड थर पसरावा. या थरावर बेण्याचा १० सेंमी जाडीचा थर पसरावा. याप्रमाणे बेण्याचा थर व त्यावर वाळूचा थर असे आलटून पालटून खड्ड्यात तळापासून ४५ से ५० सेंमी उंचीपर्यंत थर भरावेत. खड्ड्यावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे. ही फळी व बेण्याचा थर यामध्ये १० सेंमी खोल मोकळी जागा ठेवावी. खड्ड्यातील बेण्याला हवा मिळविण्यासाठी फळीला मधे भोक ठेवावे. खड्ड्यावर वाळलेल्या गवताचे छप्पर तयार करावे. त्यामुळे अकाली पावसापासून बेण्याचे संरक्षण होते.

बेणे ठेवावयाचे आले काढणीनंतर असणार्‍या जाड मुळ्या तोडून सावलीत हवेशीर ठिकाणी रचून साठवण करावी. परंतु या पद्धतीने वजनामध्ये २५ ते ३० % घट येते. त्यामुळे आले काढल्यानंतर चांगले निवडलेल्या गड्डे बेण्यावर क्किनॉलफॉस २५ ई.सी. २० मि.ली. आणि कार्बेन्डेझिम ५० डब्ल्यू पी. १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेवून त्यात १० ते १५ मीटर बुडवावेत, त्यांनतर ते सावलीत सुकवावे.

अशा प्रकारे प्रक्रिया केलेल्या बियाण्याची साठवण चार खणून किंवा खड्ड्यात केली असता त्याची उगवण क्षमता चांगली राहते. त्यासाठी सावलीत आपल्या बियाण्याच्या गरजेनुसार आवश्यक तेवढ्या लांबी रुंदीचा व एक मीटर खोलीचा खड्डा काढावा.

खड्डा खोदताना त्या जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा खोल आहे. याची खात्री करून घ्यावी. खड्ड्याच्या तळाला व कडेला लाकडाचा भुसा, पालापाचोळा अगर वाळलेले गवत टाकावे. अशा खड्ड्यामध्ये बियाण्याची साठवण करावी. खड्ड्याच्या तोंडावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे व त्यास हवेसाठी छिद्र ठेवावे. खड्ड्यातील आले व फळी यामध्ये अंतर सोडावे की जेणेकरून खड्ड्यात हवा खेळती रहावी. अशाप्रकारे साठविलेल्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहते. पत्र्याची सिमेंट, अगर कौलारू बंद खोली बेणे साठवणीसाठी वापरू नये. अडीच ते तीन महिन्यात आल्याच्या कंदाचे डोळे फुगून बारीक कोंब येतात. असे कोंब आलेले आले बेण्यासाठी वापरावे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम