कमी पाण्यात तग धरून उत्पन्न देणारे ‘ड्रॅगन फ्रुट’

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | आकर्षक रंगाचे परंतु तरीही ‘ड्रॅगन’ या भितीदायक नावाने ओळखले जाणारे हे निवडूंग (कॅक्ट्स) वर्गातील फळपीक असून या फळाचे मूळ स्थान मेक्सिको आणि अमेरिका आहे. ते मुख्यतः व्हिएतनाम देशात उत्पादित होत असले तरी या फळपिकाची लागवड थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येते. वरून गुलाबी, पिवळा आणि वरून गुलाबी व आतून पांढरा गर असे ‘ड्रॅगन फ्रुट’ चे तीन प्रकार आहेत. यातील वरून गुलाबी दिसणार्‍या फळाचा गरही गुलाबी, तर पिवळ्या रंगातील फळाचा गर पांढरा असतो. ‘सध्या तरी भारतात मोठय़ा प्रमाणावर लागवड होत नसल्याने श्रीलंका व चीनमधून आयात केले जाते. हे फळ वर्षभर उपलब्ध असते. पारंपरिक पिकांशिवाय विशिष्ट वनस्पतीसुद्धा शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळवून देवू शकतात, याचे हे चांगले उदाहरण आहे.

या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची फुले रात्री उमलतात म्हणून तिचे परागसिंचन वटवाघूळ व पतंग यांच्यामार्फत होते. फुले रात्री उमलत असल्याने या वनस्पतीला ‘मून फ्लॉवर’ किंवा ‘क्वीन ऑफ नाईट’ असेही म्हणतात. या वनस्पतीच्या पानालाच हे फळ लागते. कळी लागल्यापासून एक महिन्यात हे फळ पक्व झाल्यावर ते गुलाब पुष्पासारखे दिसते. फळाच्या सालीवरच पाकळ्या असतात. साल गुलाबी व पाकळ्याही गुलाबी व त्यांना हिरवी छटा असते. अंडाकृती आकाराच्या या फळाचा काप घेतला तर ते पेरूसारखे दिसते. आतला गर पांढरा व त्यात सब्जासारख्या बारीक काळ्या रंगाच्या बिया असतात. फळाचा गर तोंडात टाकताच आइस्क्रीमप्रमाणे विरघळतो, किवी किंवा पिअरप्रमाणे याची चव आंबूस व थोडेशी गोड अशी असते. हे फळ गंधहीन असते. फळात कॅलरीज अत्यंत कमी असून ‘क’ जीवनसत्त्व अधिक असते. तसेच कॅल्शिअम आणि फॉस्फरस ही पोषणतत्त्वेही या फळात असतात. सॅलड, सूप, टेबल डिश, थाईकरी यासाठी या फळाचा वापर केला जातो.

आपल्या प्रदेशातील आणि परदेशातील ‘ड्रॅगन फ्रुट’ च्या चवीत फारसा फरक नसतो; मात्र आपल्याकडील फळांचा आकार थोडा कमी असतो. वातावरणात आर्द्रता जास्त असेल तर फळांचा आकार आणि वजनही चांगले मिळते. तरीही आपल्याकडील ‘ड्रॅगन फ्रुट’ चे फळ सुमारे १ किलो वजनाचे असते.

हवामान आणि जमीन :
ही वनस्पती मध्यम पाऊस असणार्‍या कोरड्या हवामानात वाढते. अतिपाऊस व अतिथंड हवामानात तिची वाढ होत नाही. ३५ ते ४० अंश सेल्सिअसपुढे तापमान गेल्यास ‘सनबर्न’चा धोका असल्याने सावली किंवा फॉगर्स किंवा पाण्याची फवारणी यासारखे उपाय घ्यावे लागतात.

कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकणारी ही वनस्पती आहे. परंतु पाण्याचा निचरा होणाऱ्या मुरमाड व हलक्‍या प्रतीच्या जमिनीत चांगली वाढ होते. फळांच्या चांगल्या प्रतीसाठी पाण्याचा निचरा होणे हि बाब अत्यंत आवश्यक आहे.

लागवड :
‘ड्रॅगन फ्रुट’ ची लागवड १४ बाय ७ फूट अंतरावर करतात. लागवडीसाठी काही ठिकाणी या फळपिकाची रोपे ५० ते ६० रुपये या भावाने विकत मिळतात. हे पीक निवडुंगाच्या प्रकारातील असल्याने त्याला आधार देण्यासाठी एकरी ४०० याप्रमाणे सिमेंटचे खांब उभे करावे लागतात. कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या खांबांचा वेलींना आधार द्यावा लागतो. त्यासाठी मातीचे भोद तयार करून खांबाच्या जवळ ‘ड्रॅगन फ्रूट’ च्या एकावेळी चार बाजूस चार रोपांची लागवड करतात. पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक भोद हा सुमारे तीन फूट उंचीचा करून घेतात. एकाच ओळीतील प्रत्येक खांबावरून लोखंडी तार ओढून मांडव तयार करतात.

खत व्यवस्थापन :
लागवड करतेवेळी प्रत्येक सिमेंटच्या खांबाभोवती एक पाटी चांगले कुजलेले शेणखत घालतात. एक वर्षानंतर फळधारणा झाल्यानंतर प्रतिझाड २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट, २०० ग्रॅम पोटॅश, १०० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य व ५० ग्रॅम सिलिकॉनची मात्रा देतात. फळांचा बहार धरण्यासाठी वर्षातून एकच वेळा हि मात्रा द्यावी लागते.

पाणी व्यवस्थापन :
पावसाळ्याव्यतिरिक्त प्रतिझाड आठ लिटर पाणी लागते. उन्हाळ्यात किंवा फळधारणा अवस्थेत ही गरज वाढते. ठिबकद्वारे केवळ चारच तास पाणी दिले तर सुमारे एक किलो वजनाचे एक फळ मिळते. पाणी कमी असेल तर फळांचे वजन कमी होते. निवडुंग वर्गीय वनस्पती असल्याने ‘ड्रॅगन फ्रुट’ ची बाग पाण्यावाचून जळून जात नाही. पाणी नसेल तरीही ‘ड्रॅगन फ्रुट’ चा बहार धरता येतो.

paid add

फळधारणा आणि काढणी :
वाढलेल्या रोपांना खांबाला सुतळीने बांधून रोपे तारेवर चढवतात. आधारासाठी खांबाच्या शेवटच्या टोकाला चौकोनी रिंग तयार करून त्यावर रोपे सोडतात. रिंग व तारेच्या आधाराने तेथे ‘ड्रॅगन फ्रुट’ चांगलेच पसरते. पानाच्या डोळ्यातूनच दुसरा डोळा फुटून त्याचा फुटवा वाढतो. एक वर्षातच फळधारणा सुरू होते. एका वर्षातून पाच ते सहा वेळा फळांचा बहार येतो. ‘ड्रॅगन फ्रुट’ चा बहार जून ते नोव्हेंबरपर्यंत म्हणजे सहा महिने असतो. या काळात बहरावर बहर येतो. एकाच पानाला सुमारे तीन ते पाच कळ्या निघतात. कळीचे फूल व फुलातून फळ अशी क्रिया घडते.

‘ड्रॅगन फ्रुट’ च्या प्रत्येक झाडापासून सुमारे ३० ते ३५ किलो, तर एकरी सुमारे १५ ते १८ टन फळे निघतात. मोठ्या बाजारपेठेत प्रतिकिलो २०० ते २५० रुपये इतका भाव मिळतो. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, इ. मोठ्या शहरांमध्ये या फळाला जास्त मागणी आहे.

किडी व रोग नियंत्रण :
‘ड्रॅगन फ्रुट’ वर डाळिंबावरील ‘तेल्या’ सारखा रोग पडतो. त्यामुळे त्याची पाने सडतात. साधारणपणे उन्हाळ्यातच या रोगाचा प्रादूर्भाव होतो. अतिपाऊस व पाण्यामुळे फळकुज होऊ शकते. त्याचप्रमाणे झेंटोमोनस कॉम्पेट्रिस या बुरशीमुळे ही वनस्पती ‘मर’ रोगाला बळी पडते. फळ बहराच्या काळात बुरशीजन्य व कीडनाशक औषधांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या दर पंधरा दिवसांतून एकदा कराव्या लागतात. बाकी वर्षभर कोणतीही फवारणी करावी लागत नाही.

‘ड्रॅगन फ्रुट’ कोणी खावे?
बाहेरून दिसायला गडद गुलाबी रंगाचे व आतला गर पांढरा असून खाण्यायोग्य काळ्या बिया असतात. अतिशय मोहक असे हे फळ चवीला मात्र बऱ्यापैकी सौम्य व बेचव असते. यातील पोषकतत्वे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या फळात असलेली कर्बोदके आतडय़ांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. जीवनसत्व ‘ब’ भरपूर असल्याने मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. तणाव कमी करणारे तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे फळ आहे. त्वचा टवटवीत, तजेलदार व चकचकीत ठेवण्यास हे फळ उपयोगी ठरते. शर्करेचे प्रमाण अल्प असल्याने मधुमेहासोबत रक्तदाब व ह्रदयविकार रुग्णांसाठी हे फळ वरदान आहे. त्यातील अ‍ॅण्टिऑक्सिडंट पेशी सुदृढ ठेवण्यास मदत करतात.

‘ड्रॅगन फ्रुट’ खायचे कसे?

नवीन माणसाला हे फळ कसे खायचे, ते माहीत नसते. या फळाची साल काढून गराच्या चकत्या करून हे फळ खाता येते किंवा केळाची साल अर्धवट सोलून केळ जसे खातो तसेही ते खाता येते. कात्री किंवा चाकूच्या साहाय्याने फळावर उभे चार काप केले तर साल अर्धवट सोलता येते. अशावेळी ते फळ आईस्क्रीमसारखेच दिसते. हे फळ फ्रीजमध्ये थंड करून खाल्ल्यास फारच छान लागते.

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांत अद्याप ‘ड्रॅगन फ्रुट’ विषयी संशोधन झालेले नाही. एखाद्या नवीन फळाची लोकांना जोपर्यंत आवड निर्माण होत नाही, तोपर्यंत त्याला बाजारपेठ उपलब्ध होत नसते. अशावेळी बाजारपेठेचा अंदाज घेऊनच एखाद्या नवीन पिकाची लागवड करणे योग्य ठरते. विदेशातील वातावरण व आपल्याकडील वातावरण वेगळे असले तरी बहुतांश पिके कोणत्याही वातावरणात येतात; पण त्याचे उत्पादन कमी-जास्त होते, चवीतही फरक पडतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम