सुधारित कारले लागवड तंत्र

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | ‘कडू कारल्यास आपल्या आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये शरीराच्या वाढीस, पोषण व आरोग्य रक्षणासाठी असलेली खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते.

हा आशिया, आफ्रिका व कॅरिबियन बेटे या उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा एक वेल आहे. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी लांब, लांब देठावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्की फळे गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी लांब, लोंबकळणारी, विटीच्या आकाराची व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात. कारले फार कडू वाटले तर भाजी करताना त्याच्यातून निघालेले पाणी कमी करून भाजी करतात.

जमीन व हवामान :
कारले हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. हलकी ते मध्यम काळी, पोयट्याची ते रेताड जमिनीमध्ये कारले लागवड करता येते. उत्तम निचरा असलेली ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन कारले उत्पादनासाठी योग्य असते. खारट, चोपण तसेच चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत कारल्याची लागवड करू नये.कारले हे पिक उष्ण हवामानात चांगले येते. जास्त थंडी असल्यास बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव होवून नुकसान होते. तसेच जास्त पाऊस असल्यास लागवड करू नये. कारण मुळांशी पाणी साचल्यास वेली पिवळ्या पडण्याची शक्यता असते.

सुधारित जाती :
१. हिरकणी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संशोधित जात. फळे आकर्षक, गर्द हिरव्या रंगाची, भरपूर काटे असून फळाची लांबी १५ ते २० सेंमी, मध्यभागी गोलाकार व दोन्ही बाजूस निमुळती असतात. वजन साधारण ५० ग्रॅम असते. लागवडीनंतर ६० दिवसांनी फळे काढणीस येतात. उत्पादन एकरी १० ते १२ टन असून काळ्या जमिनीतदेखील चांगले येते.

२. पुसा विशेष – भारतीय कृषि अनुसंधान केंद्र, दिल्ली संशोधित जात. बुटकी जात असल्याने एकरी झाडांची संख्या जास्त ठेवता येते. फळे हिरवी, मध्यम लांबीची, जाड साल असलेली असून भाजीसाठी लोणच्यासाठी योग्य आहेत.

३. अर्का हरीत – भारतीय बागवानी अनुसंधान संस्था, बैंगलोर संशोधित जात. फळे हिरवी, जाड व भरपूर गर असलेली असतात.
४. कोइमतूर लाँग – तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर संशोधित जात. फळे लांब व फिकट हिरवी असतात.
५. महिको एमबीटीएच १०१ – संकरीत जात. ५० ते ५५ दिवसात पीक तयार होते. फळाचे सरासरी वजन ६५ ते ७० ग्रॅम असून फळांची लांबी १८ ते २० सें.मी. असते. फळे गडद हिरव्या रंगाची, चांगल्या शिरा असलेली जात आहे. एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते.
६. महिको एमबीटीएच १०२ – संकरीत जात. ५५ ते ६० दिवसात पीक तयार होते. फळाचे सरासरी वजन १०० ते १२० ग्रॅम भरते. फळांचा रंग पांढरा असून फळे ३० ते ३५ सें.मी. लांब व बारीक असतात. एकरी १२ ते १४ टन उत्पादन मिळते.
७. महिको ग्रीन लाँग – फळांचा रंग गडद हिरवा व टोकाकडे फिकट असून इतर वैशिष्ट्ये महिको व्हाईट लाँग प्रमाणेच आहेत.
८. महिको व्हाईट लाँग – लागवडीपासून ७५ ते ७८ दिवसात पीक काढणीस तयार होते. फळाचा रंग पांढरा, साल मध्यम जाड व भरपूर शिरा असून फळांची लांबी ९ ते १२ इंच असते.
९. जौनपुरी – एक फूट लांब असलेली हिरवी फळे. मुंबई मार्केटमध्ये बऱ्यापैकी मागणी असते. तर इतर राज्यांमध्ये कमी मार्केट असते. या जातीस शिरा व टणकपणा कमी असतो.
१०. पांढरी कारले – मागणी चांगली असते, परंतु हिरव्या कारल्यापेक्षा कमी भाव मिळतो. दुबईसारख्या देशात निर्यात होते.
यासोबतच फुले ग्रीन गोल्ड, अर्का हरित, पुसा मोसमी, इत्यादी जातींचीही आपल्या भागात लागवडीसाठी निवड करता येते.

लागवड :

लागवडीसाठी एकरी ३०० ते ३५० ग्रॅम बी लागते. हिवाळ्यामध्ये उगवण लवकर व सशक्त होण्यासाठी १ लिटर पाण्यामध्ये २० – २५ मिली जर्मिनेटर टाकून बी १२ तास भिजवावे. नंतर ते सुकवून लावल्यास ३ -४ दिवस लवकर उगवण होते. एरवी यासाठी १० ते १५ दिवस लागतात. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा १० ग्रॅम कार्बनडेझिमची बीजप्रक्रिया करावी.कारल्याची लागवड कोणत्याही हंगामात करता येते. खरीप हंगामात जून – जुलैच्या पहिला आठवड्यात तर उन्हाळ्यात जानेवारी – फेब्रुवारी मध्ये लागवड करतात. परंतु लागवड सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात केल्यास जानेवारी – मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान कारले मार्केटला येते व या वेळेस भावही चांगला मिळाल्याचे निदर्शात आले आहे.पिकाच्या चांगल्या वाढीसाठी प्रती एकर १५ टन शेणखत किंवा एरंड पेंड १५ किलो जमीन तयार करताना द्यावे. खोल नांगरट करून जमीन सपाट करून घ्यावी. १.५ ते २ मीटर अंतराच्या ओळी तयार कराव्यात. ट्राइकोडर्मा विरडी २५० ग्रॅम प्रति १० किलो शेणखतासोबत पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणाऱ्या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणाऱ्या मर रोगापासून पिकाचे रक्षण होते.५ ते ६ पाने आल्यानंतर मांडव करावा. मंडप पद्धतीमध्ये दोन ओळींतील अंतर १० ते १२ फूट आणि दोन वेलींतील अंतर तीन फूट ठेवून या वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात, त्यासाठी १० ते १२ फूट अंतरावर रीजरच्या साह्याने सरी पाडावी.

मांडव पध्दतीमुळे फळे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचावर वाढतात, त्यामुळे पाने आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ते सडत नाहीत, कीड आणि रोगांचे प्रमाण कमी राहते.फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. फळांची तोडणी, कीडनाशकांची फवारणी करणे सोपे होते.या पद्धतीने ट्रॅक्‍टरच्या किंवा बैलांच्या साह्याने आंतरमशागत करता येते.
वेल मंडपावर पोचेपर्यंत दीड ते दोन महिने कालावधी जातो, त्यामुळे या पिकांमध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.

 

अन्नद्रव्ये व पाणी व्यावस्थापन :
चांगले कुजलेले शेणखत १२ ते १५ टन वापरावे. चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी प्रती एकर २० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश लागवडीच्यावेळी द्यावे. त्यानंतर ३० ते ३२ दिवसांनी प्रती एकर २० किलो नत्र द्यावे.वातावरण, जमिनीचा मगदूर व पिकाची अवस्था विचारात घेऊन दर ३ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. फळे लागणीच्या काळामध्ये पाणी अनियमित दिल्यास फळे वेडीवाकडी होऊन फळाची प्रत कमी होते. अधिक पाणी दिल्यास बुरशीजन्य रोगांमुळे वेली पिवळ्या पडतात.

 

तण व फुलगळ नियंत्रण :सव्वा लीटर पेंडीमेथलीन प्रती २०० लीटर पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ४८ तासांच्या आत जमीन ओलसर असताना ऐका एकरात फवारावे. १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करावी.फुलगळ रोखण्यासाठी, उत्पादनात १० % वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना ३ मिली ह्युमिक एसिड + ५ ग्रॅम १२:६१:०० प्रति लीटर पाण्यातून फवारावे. फुले, फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात, ३५० मी.ग्रॅ.च्या सॅलिसीलिक ऍसिडच्या ४-५ गोळ्या १५ लीटर पाण्यातून १-२ वेळा फवाराव्यात. तसेच चांगली फुलधारणा मिळण्यासाठी १५० ग्रॅम ०:५२:३४ प्रति १० लिटर पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारणी घ्यावी. तसेच गुणवत्ता मिळण्यासाठी फळ धारणा अवस्थेत १३:०:४५ व बोरॉन फवारले जाते.

रोग व कीड प्रादुर्भाव :

कारले पिकावर भुरी, केवडा व मर या रोगांचे प्रमाण जास्त असते. तसेच कारले पिकास फळ किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणवर होतो. यामुळे फळांचा दर्जा कमी होऊन बाजारभाव कमी मिळतो. पांढरी माशी, नाग अळी, मावा, तुडतुडे, अंकुर आणि मुळे खाणारी अळी, देठ कुरतडणारी अळी, पाने खाणारे लाल किडे, सूत्रकृमी इत्यादी किडींचा देखील प्रादुर्भाव कारले पिकावर आढळतो.

 

तोडणी व उत्पन्न :
लागवडीनंतर ५५ ते ७० दिवसांनी तोडणी सुरू होते. सर्वसाधारणपणे १०० ते १८० दिवसांपर्यंत वेलीला कारले येत राहतात. संकरीत जातीपासून एकरी १० ते १५ टन आणि साधारण जातीपासून ४ ते ६ टन उत्पादन मिळते.

आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण असणाऱ्या, सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या व बाजारपेठेत नेहमी बऱ्यापैकी मागणी असणाऱ्या कारले या वेलवर्गीय फळभाजीची व्यापारी तत्त्वावर लागवड केल्यास फायदेशीर ठरते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम