कृषीसेवक | २६ ऑक्टोबर २०२३
देशभरातील अनेक शेतकरी विविध प्रकारची शेती करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. गेल्या काही वर्षापासून अनेक शेतकरी मत्स्य व्यवसाय दुय्यम व्यवसाय करीत आहेत. त्यासाठी मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याबाबत मत्स्य विभाग अनुकूल आणि सकारात्मक भूमिका घेईल. मात्र, याबाबत इतर विभागांशी निगडित बाबींचा विचार करावा लागेल. त्यासंदर्भात निश्चितपणे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्यासंदर्भातील मागणी संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीसाठी आमदार प्रवीण दरेकर, आमदार महेश बालदी, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अतुल पाटणे, उप सचिव (मत्स्य) कि. म. जकाते, सहआयुक्त (मत्स्य – सागरी) महेश देवरे, रवींद्र वायडा, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य अभियंता आर.एम. गोसावी आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाला तर निश्चितपणे मच्छिमार बांधवांना शेतीसाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. वीज, पाणी, कोल्ड स्टोरेज आदी सुविधाही त्यांना मिळू शकतील. मात्र, या व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यावर आणखी काय बाबी अंतर्भूत होऊ शकतात, इतर विभागांशी निगडित परवानगी त्यासाठी आवश्यक आहेत का, याचाही विचार केला जाईल. तसेच, राज्य मंत्रिमंडळासमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, रोजगाराशी निगडित ही बाब आहे. त्याचा अनुकूल आणि सकारात्मक परिणाम यावर होईल. त्यामुळे मच्छिमार बांधवांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे. अतिशय गांभीर्याने यावर निर्णय होईल, असे मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम