कृषी सेवक । ४ जानेवारी २०२३ । कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण सातत्यानं दरांमध्ये घसरण होत आहे. या मुद्यांवरुन सातत्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आवाज उठवत आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारयांची भेट घेतली.
सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसंदर्भात राज्य सरकारनं तातडीने केंद्र सरकारशी चर्चा करावी. याबाबत पाठपुरावा करुन शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेण्याची मागणी तुपकरांनी केली. याबाबत मुनगंटीवार यांनी तातडीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या दरवाढीसाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
सोयाबीन आणि कापसाला खासगी बाजारात चांगला दर मिळावा, तो स्थिर रहावा, यासाठी सोयापेंड (डीओसी) निर्यातीला प्रोत्साहन द्यावं. मागील वर्षी आयात केलेल्या 5 लाख मेट्रिक टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी. सोयापेंड आयात करु नये. यंदा 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी. सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी. खाद्य तेल आणि इतर तेलावरील आयात शुल्क 30 टक्के करावं. कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे 11 टक्के ठेवावं. कापूस आणि सूत निर्यातील प्रोत्साहन द्यावं. तसेच सोयाबीनवरील 5 टक्के GST रद्द करावा आदी केंद्राशी संबंधित मागण्या तुपकर यांनी केल्या आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम