बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना बसतोय फटका

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ४ जानेवारी २०२३ । राज्यात गारठा वाढला असताना काही भागात मात्र, पावसानं हजेरी लावली आहे. सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. याचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसत आहे. आधीच अतिवृष्टी झाल्यामुळं मराठवाडा आमि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातची पीक वाया गेली आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशातच आता रब्बी हंगामातील पिकांनाही अस्मानी संकटाचा फटका बसत आहे. त्यामुळं रब्बी हंगाम देखील वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आठ ते 11 जानेवारी, या कालावधीत विदर्भातील काही भागासह राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 9 अंशावर गेल्यानं हुडहुडी वाढली आहे. तर औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरल्याचे पाहायला मिळालं. दोन्ही ठिकाणी 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यातही पारा घरसला असून तिथं 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईसह कोकणात देखील थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. हा प्रभाव उत्तर भारतातील थंडी राजस्थान गुजराथ मार्गे कोकणात उतरत आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातही थंडीचा प्रभाव आहेच, परंतू त्यामानानं काहीसा कमी जाणवत आहे.

देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसात वायव्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारत आणि मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 2 ते 6 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम