मोगरा फुलशेती करा आणि मिळवा भरघोस नफा; वाचा… किती मिळतो भाव!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ एप्रिल २०२४ | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात फुल शेतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यातही शेतकरी शेवंती, गुलाब, झेंडू या फुलांकडे अधिक प्रमाणात वळत आहे. काही प्रमाणात मोगऱ्याच्या फुलांची देखील शेतकरी लागवड करत आहे. परंतु, इतर फुलांपेक्षा मोगरा लागवडीचे प्रमाण कमी आहे. मोगऱ्याचे फुल हे दररोज देव पूजेसाठी, सणसमारंभांसाठी तसेच सौंदर्य प्रसाधने उद्योग, केसांचे तेल यामध्ये वापरले जाते. ज्यामुळे नेहमीच मोगऱ्याच्या फुलांना मोठी मागणी असते.

शेती तज्ज्ञांनी मोगऱ्याच्या शेतीला व्यावसायिक शेती पीक मानले आहे. मोगऱ्याचे झाड १० ते १५ फूट उंचीपर्यंत वाढते. त्याची सदाहरित पाने दोन ते तीन इंच लांब आणि देठ पातळ असते. मोगऱ्याची फुले पांढरी असतात. ती अतिशय सुंदर आणि सुवासिक असते. मोगऱ्याच्या झाडाला मार्च ते जून महिन्यात फुले येतात. मोगऱ्याचा फुलाचा वापर विशेषत: हार, सजावट आणि देवाच्या पूजेमध्ये केला जातो. मोगऱ्याची लागवड जून ते नोव्हेंबर या कालावधीदरम्यान केव्हाही केली जाऊ शकते.

मोगऱ्याच्या फुलांना २५० रुपये प्रति किलोचा भाव सहज मिळतो. तर लग्न सोहळा किंवा सण-समारंभाच्या काळात ही ४०० रुपये प्रति किलोपर्यंत विकली जातात. मोगऱ्याच्या फुलांचा उपयोग परफ्यूम, साबण, क्रीम, तेल, शॅम्पू आणि डिटर्जंट पावडरमध्ये सुगंधासाठी केला जातो. भारतात याची लागवड प्रामुख्याने पंजाब, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि हरियाणामध्ये केली जाते.

हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये नवीन वाणांपासून चांगली कमाई करता येते. मोगऱ्याच्या लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान उत्तम मानले जाते. त्याचवेळी, त्याच्या काही जाती अगदी थंड हवामानात देखील सहजपणे वाढू शकतात. रोपाच्या वाढीसाठी सर्वात योग्य तापमान २४ अंश सेल्सिअस ते ३२ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.

या झाडांना नियमित पाणी देणे खूप गरजेचे आहे. उन्हाळी हंगामात आठवड्यातून किमान दोनदा पाणी द्यावे. मध्यम हवामानात आठवड्यातून एकदाच पाणी देणे पुरेसे असते. मोगऱ्याला हंगाम आणि जमिनीनुसार सिंचन आवश्यक असते. मोगऱ्याचे रोप लावल्यानंतर ९ ते १० महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात होते. तर काही जातींमध्ये वर्षभर झाडांना फुले येतात. बहुतेक प्रजातींमध्ये फुलांचा काळ हा मार्च ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत असतो. सकाळी सूर्याची किरणे फुलांवर पडण्याआधी फुले तोडली तर उत्तम असते. त्यामुळे त्यांचा सुगंध टिकून राहण्यास मदत होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम