संत्रा व मोसंबी – आंबे बहार व्यवस्थापन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | मराष्ट्रामध्ये कोकण विभाग वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या पिकांची लागवड केली जाते. निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी जून-जुलै महिन्यांमध्ये येणाऱ्या बहारास ‘मृग बहार’ आणि ऑक्‍टोबरमध्ये येणाऱ्या बहारास ‘हस्त बहार’ तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या बहरास ‘आंबे बहार’ म्हणतात.
कोणत्या बहारासाठी कधी ताण द्यावा :
मृग बहाराच्या बागेस ताण सोडण्याची प्रक्रिया पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने हा बहार बऱ्याच वेळा खात्रीशीर ठरत नाही. मृग बहारामध्ये संत्रा-मोसंबीच्या बागेत झाडावर वाजवीपेक्षा अधिक ताण आल्यास काही करता येत नाही. बाहेरचे तापमान खूप जास्त असल्याने पाणी देऊन बाग ताणाच्या धोक्‍यापासून वाचविली तरी आलेली फुले टिकत नाहीत. याशिवाय या बहारास वळवाच्या पावसामुळे धोका निर्माण होतो, मध्येच बागेची ताणाची स्थिती बिघडते आणि नुकसान होते. त्या तुलनेत आंबे बहाराच्या संत्रा-मोसंबी बागेस पाणी देणे निसर्गावर अवलंबून नसल्याने हा खात्रीचा बहार ठरतो.

आंबे बहार व्यवस्थापन
संत्रा-मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी-जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. साधारणतः या काळात वातावरण पोषक नसते. झाडांवर नवीन वाढ होत नाही. त्यामुळे या विश्रांतीच्या काळात अतिरिक्त शर्करेचा संचय झाडाच्या ६ ते ९ महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो. हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो. या बहारामध्ये संत्रा-मोसंबी झाडाची वाढ कडाक्‍याच्या थंडीत थांबते. डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः १० अंश सेल्शिअसपेक्षा कमी असते, परिणामी झाडांना नैसर्गिक ताण बसतो. यामुळे संत्रा-मोसंबीच्या आंबे बहाराला ‘नैसर्गिक बहार’ म्हणतात. या ताणामुळे झाडे खराब होत नाही.
फळे घेण्यापूर्वी संत्रा-मोसंबीच्या झाडाची चांगली व जोमदार वाढ झालेली असावी. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षात झाडांची योग्य निगा घेतल्यानंतर फळे घेण्यास सुरुवात करावी. झाडांची वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देऊन कमी प्रमणात फळे घ्यावीत. डाळिंब आणि पेरुप्रमाणेच संत्रा-मोसंबी या फळपीकातही ताण देणे खूप आवश्यक असते.

ताण देणे
काळ्या जमिनीचा थर किमान १.२० मीटर पासून १५ मीटरपर्यंत असतो. या जमिनीत ताणावर झाडे सोडताच झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात. मुळात काळी जमीन उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत राहतो व झाडाला ताण बसत नाही.
अशा जमिनीत बगिचा संपूर्ण ऑक्‍टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात, वखरून साफ ठेवावा.
१५ डिसेंबरच्या आसपास झाडांच्या ओळींमधून लाकडी नांगराने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात. टोकावरची तंतूमुळे तुटल्यामुळे झाडे ताण बसतो. तसेच २ मि.लि. क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड (लिहोसीन) प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे कायिक वाढ रोखणारे संजीवक आहे.
ताण चालू केल्यानंतर पानांचा रंग कमी होऊन फिक्कट व नंतर पिवळा होतो. असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरु असते. २५ % पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे. पानांनी तयार केलेले कर्बयुक्त अन्न झाडांच्या फांद्यात साठते. या कर्बयुक्त अन्नपदार्थांचा उपयोग झाडांना नवीन पालवी फुटण्यास, फुले येण्यास, फळधारणा होण्यास होते. अशाप्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यावसायिक दृष्ट्या ते खूप फायद्याचे ठरते.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडल्यानंतर त्वरीत प्रत्येक झाडाला ४० ते ५० किलो शेणखत टाकून आडवी आणि उभी वखरण करावी. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तापमान वाढताच हलके ओलित करावे. ताण तोडतांना हलक्‍या ओलिताअगोदर प्रत्येक झाडाला ६०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ४०० पालाश आणि भरखते द्यावीत, त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. अश्याप्रकारे दिल्या जाणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या पाण्याला आंबवणी व चिंबवणी असे म्हंटले जाते. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यावर २० ते २५ दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावा. हलक्‍या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.

पाणी व्यवस्थापन
आंबे बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरुरी आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते म्हणून आंबे बहार घेतांना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरुरीचे आहे. ओलितासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनीच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. बागेतील काही झाडांच्या खोडाजवळ मका टोकावी व मका सुकलेली दिसल्यास झाडांना पाणी द्यावे.

अच्छादन
वाफ्यतील ओलावा टिकविण्यासाठी ६ सेंमी जाडी गवताचा थर देऊन आच्छादित करावा. त्यामुळे ओलावा टिकतोच; पण फळांची गळसुद्धा कमी होते. जमिनीतील जिवाणू सक्रिय होऊन अन्नद्रव्ये मुळांना सहज उपलब्ध होतात.

 

बहार धरताना या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे –

ताण देणे चालू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे, वाळलेल्या, रोगट फांद्या काढून टाकाव्यात.
बागेचे पाणी हळूहळू कमी करत नंतर बंद करावे. एकदम पाणी बंद करू नये.
किती काळ ताण द्यायचा हे जमिनीची प्रत व झाडाचे वय पाहून निश्चित करावे.
आवश्यकतेपेक्षा जास्त ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
झाडांची नियमित पाहणी करून कीड व रोग नियंत्रणाचे उपाय योजावेत.
सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी बागेभोवती झंडूच्या रोपांची लागवड करावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम