कृषी सेवक I २९ डिसेंबर २०२२ Iजिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत १०४९ जनावरांना लागण झाली असून, त्यापैकी ३६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. कणकवली आणि कुडाळ तालुक्यांत अधिक प्रभाव जाणवत असल्यामुळे तेथील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांत लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव जाणवत होता. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा लम्पी स्कीन प्रादुर्भावापासून काहीसा दूर होता. परंतु महिनाभरापासून जिल्ह्यात लम्पी स्कीनचे जनावरे आढळून येण्यास सुरुवात झाली. कुडाळ आणि कणकवली तालुक्यातील अनेक गावांमध्ये हा प्रादुर्भाव अधिक जाणवत होता. परंतु त्यानंतर जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये देखील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव जाणवू लागला.
लम्पी स्कीनची लागण दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत १ हजार ४९ जनावरांना लागण झाली आहे. त्यापैकी ३६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ५४३ जनावरे उपचाराने पूर्णपणे बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू आहेत. जनावरे दगावलेल्या ९ पशुपालकांना १ लाख ९८ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित पशुपालकांना देखील अनुदान देण्याची प्रकिया सुरू आहे. लम्पीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने १ लाख २ हजार ५३९ जनावरांना लसीकरण केले
आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम