नीरा-देवघर धरण प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आंदोलन

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १९ डिसेंबर २०२२ I हिर्डोशी येथील नीरा-देवघर धरण प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्‍न अद्याप सोडविण्यात आला नाही. यासाठी हिर्डोशी येथील ग्रामस्थांनी महिलांसमवेत शनिवारपासून (ता.१७) गावात बेमुदत आंदोलन सुरू केले.

 

सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या १७ वर्षांपासून हिर्डोशीमधील ३५ कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित राहिला आहे. सर्व खातेदारांना कायदेशीर पात्रतेप्रमाणे जमीनवाटप (Land Allocation) प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.हिर्डोशीच्या पुनर्वसनाच्या प्रश्‍नावर शासनाच्या तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, आयुक्त, मंत्रालय, पुनर्वसनमंत्री व मुख्य सचिव (पुनर्वसन) आदी स्तरावर झालेल्या बैठकांमध्ये प्रशासनाने आपली चूक मान्य केली.

 

आणि ३५ खातेदारांकडून ६५ टक्के दुरुस्त रक्कम भरून घेतली. त्यानंतर तत्कालीन पुनर्वसनमंत्र्यांनी निर्देश देऊनही यावर ठोस कार्यवाही झाली नाही. यामुळे धरणग्रस्तांमध्ये चीड निर्माण झाल्याने शनिवारपासून (ता. १७) आंदोलनास सुरुवात केली आहे. दरम्यान, भोरचे तहसीलदार सचिन पाटील व नायब तहसीलदार आजिनाथ गाजरे यांनी प्रकल्पग्रस्तांशी भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेतली. आंदोलनात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रशासनाला पुनर्वसनाचा प्रश्‍न त्वरित मार्गी लावावा लागणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम