कोकणचा हापूस आंब्याचा हंगाम संपुष्टात आला असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आवक कमी झाली आहे. मात्र, आता जुन्नर आंबेगावमधील हापूसचा हंगाम सुरू झाला आहे आणि २० जूनपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबई: कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपल्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील हापूसची आवक कमी झाली आहे. परंतु जुन्नर आंबेगाव परिसरातील हापूस आंबा बाजारात उपलब्ध आहे.
बाजार समितीत १५ जूननंतर उत्तर प्रदेशमधील लंगडा आणि दशेरी आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक अपेक्षित आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देखील आंब्याची चव घेण्याची संधी मिळणार आहे.
कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपत आला असताना जुन्नर, आंबेगाव परिसरातील हापूसची आवक बाजारात सुरू झाली आहे. गुजरातमधील हापूसचा हंगामही लवकरच संपणार आहे.
सोमवारी बाजार समितीत महाराष्ट्राच्या विविध भागांतून १२ हजार पेट्या आणि इतर राज्यांमधून १३,९३१ पेट्या आल्या आहेत. जुन्नर आणि आंबेगाव परिसरातील हापूसचा हंगाम सुरू झाला असून प्रतिदिन जवळपास १० हजार पेट्यांची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये जुन्नर हापूसला २०० ते ५०० रुपये डझन एवढा दर मिळत आहे.
जीआय मानांकनासाठी प्रयत्न
भीमाशंकरच्या पट्ट्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यामधील आंबा दरवर्षी जून महिन्यात बाजारात येतो. या भागातील आंब्याचे उत्पादन वाढत असून दरवर्षी ५ हजारांपेक्षा जास्त रोपांची लागवड होत आहे. हा आंबा शिवकाळापासून प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे त्याला शिवनेरी आंबा नावाने जीआय मानांकन मिळावे यासाठी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत.
– संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम