चांगल्या उत्पादनासाठी असे करा द्राक्षबागांचे व्यवस्थापन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | द्राक्ष वेलीच्या जीवनक्रमात एप्रिल छाटणी व ऑक्टोबर छाटणीला अत्यंत महत्त्व आहे. ऑक्‍टोबर छाटणी हे कौशल्याचे काम आहे. ऑक्‍टोबर छाटणी ही प्रत्यक्षपणे उत्पादनाशी निगडित असते. एकसारख्या निघणाऱ्या फुटी व फुटीबरोबर दिसणाऱ्या घडांच्या संख्येवर पुढील हंगामाचे भवितव्य ठरलेले असते. ऑक्टोबर छाटणी नंतरचे द्राक्ष बागेचे व्यवस्थापन करताना खालील बाबींचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते.

 

द्राक्षाचा वेल मूळचा रशियातील समशीतोष्‍ण भागांतील आहे. भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला. वायव्य हिमालयावर द्राक्षांच्या जंगली वेली आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे.

द्राक्ष हे महात्त्वाचे निर्यातक्षम; परंतु अल्पकाल टिकणारे फळ आहे. त्याचा उपयोग मुख्यत: तीन प्रकारे केला जातो. पहिल्या प्रकारात द्राक्षे ताजी खाण्यासाठी (टेबल द्राक्षे) वापरतात. दुसर्‍या प्रकारात द्राक्षे वाळवून, टिकवून खाण्यासाठी वापरतात. तिसर्‍या प्रकारात मद्य आणि इतर पेये बनविण्यासाठी द्राक्षांचा उपयोग केला जातो. जगातील द्राक्षांच्या एकूण उत्पादनापैकी ८०% उत्पादनाच वापर मद्य आणि विविध प्रकारची पेये बनविण्यासाठी केला जातो. १०% द्राक्षे ताजी खाण्यासाठी १०% मनुका तयार करण्यासाठी वापरतात. महाराष्‍ट्रांत नाशिक येथे द्राक्षांची लागवड फारच मोठया प्रमाणावर होते. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणीही द्राक्षांची लागवड आहे.

भारतात द्राक्ष लागवडीसाठी असणा-या एकूण क्षेत्राच्या निम्यापेक्षा जास्त क्षेत्र हे एकटया महाराष्ट्रातच असल्याने द्राक्ष शेतीस महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत विशिष्ट असे स्थान प्राप्त झालेले आहे. यशस्वी द्राक्ष उत्पादन हे एका विशिष्ट व उच्च तंत्रावर अवलंबून आहे. दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्षाची प्रत ही फार उच्च दर्जाची असावी लागते. अशा द्राक्षाचे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बंधूनी त्याच्या शेतावर आवलंबला तर अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या द्राक्षाची मागणी वाढून निर्यात वाढेल.

 

अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन :

द्राक्ष वेलीच्या ऑक्टोबर छाटणीनंतर आलेला फुटवा व बहार सदृढ होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन एक महत्त्वपूर्ण बाब आहे. द्राक्ष वेलीचे माती, पाणी व देठ निरिक्षण मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून करून घेतल्यास उपलब्ध आणि कमतरता असलेले अन्नद्रव्यांची पूर्व कल्पना येते व त्यानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करता येते. माती परिक्षण करून त्याप्रमाणे खत व्यवस्थापन करावे. निकृष्ट, कमी कसदार जमिनीत खतांचा वापर अधिक प्रमाणात करावा लागतो.

जमिनीतील पाणी प्रमाण, भुसभुसितपणा, खनिजद्रव्यांची उपलब्धता, क्षार व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण व त्यातून होणारी जीवाणूंची वाढ इ. बाबींचा विचार करून द्राक्ष वेलीला खते द्यावीत. तसेच जमिनीचा पोत, हवामान, वेलीचे वाय, लागवडीचे अंतर, इ. बाबींचाही विचार करावा. हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारून सुपीकता वाढविणे शक्य आहे. धैंचा, उडीद, मुग, चवळी, गिरिपुष्प, इ. पिकांचा वापर हिरवळीच्या खतांमध्ये करता येतो. तसेच कत्तलखान्यातील खत, मासळी खत, तेलबियांच्या पेंडी, इ. खतांचाही वापर करता येतो.

द्राक्ष वेलीचे जेवढे ड्राय वजन असते तेवढेच अन्नद्रव्ये वेल जमिनीतून शोषून घेत असते. वेली जमिनीतून सतत खतांची मात्रा ग्रहण करत नाही तर प्रत्येक नव्या वाढीसाठी टप्प्यात आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद व पालाश द्राक्ष वेल ग्रहण करते. नवीन फूट येताना, आलेली पाने पसरून हरीतद्रव्ये बनवत असताना व फुलोरा वाढत असताना अश्या तीन अवस्थेमध्ये वेल अन्नद्रव्ये शोषून घेत असते. सर्वसाधारणपणे एका एकरमधून १० टन उत्पन्न मिळविण्यासाठी ४० किलो नत्र व प्रत्येकी २० किलो स्फुरद व पालाश तर १६ टन उत्पादनासाठी ६२ किलो नत्र, १२ किलो फोस्फेट, ५४ किलो पालाश, ३२ किलो कैल्सियम व १८ किलो मैग्नेशियम जमिनीतून शोषून घेतले जाते. यपेक्षा अधिक दिलेल्या खतांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. एका एकरला १०० किलो अमोनियम सल्फेट छाटणी पूर्वी, छाटणी नंतर १८ ते २० दिवसांनी आणि द्राक्षवेली फुलोऱ्यापूर्वी किंवा छाटणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावा. तसेच, ३०० किलो सुपर फोस्फेट द्राक्ष बागेत चर खोडून द्यावे. छाटणीनंतर ६० दिवसानंतर वेलीचे खोड फुगू लागते, त्यावेळी ४०० किलो स्टेरामिल द्यावे.

४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व ५० किलो पालाशचा पुरवठा करण्यासाठी १० टन पूर्ण कुजलेले शेणखत बागेला टाकतात. द्राक्षबागेतील दुसऱ्या डीपिंग नंतर घड मऊ झाल्यावर प्रत्येकी १०० किलो डीएपी व एसओपी आणि ५०० किलो करंज व शेंगदाणा पेंड दिल्यास उच्च प्रतीचा आणि निर्यातक्षम गुणवत्तेचा वजनदार द्राक्षमाल तयार होतो.

द्राक्ष मण्यांमध्ये साखर भरताना तसेच फुलोरा अवस्थेत द्राक्ष वेलीला पालाशची आवश्यकता असते. छाटणीनंतर ८० दिवसांनी द्राक्ष बागेतील एखादा घड परिपक्व झाल्यावर ५० किलो एसओपी द्यावे, यावर मालाचा दर्जा, वजन, टिकाऊपणा, गोडवा अवलंबून असतो. ९० दिवसांच्या आसपास मण्यांमध्ये साखर भरली जाते. या काळात पालाश कमी पडले तर ते पानांमधून घेतले जाते, त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात. त्या खालोखाल फुलोरा अवस्थेत पालाशची आवश्यकता वेलीला असते.

द्राक्ष बागेला सेन्द्रीय खते दिल्यास जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होऊन जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढून ते अधिक कार्यक्षम होतात. बागेतील जमिनीत हवा व पाणी यांचे समप्रमाण राखून चांगले उत्पन्न घेता येते.

 

संजीवकांचे व्यवस्थापन :

उच्च प्रतीच्या निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात पीक संजीवकांचा फार मोलाचा वाटा आहे. पीक संजीवके हे वेलीच्या अंतर्गत क्रियेत अमुलाग्र बदल घडवून आणणारी महत्त्वाची रसायने आहेत. संजीवकांच्या वापराशिवाय निर्यातक्षम द्राक्षनिर्मिती अशक्य असल्यासारखेच आहे. भरघोस आणि उच्च प्रतीचे उत्पादन मिळविण्यासाठी द्राक्षाच्या खरड छाटणीपासून ते निर्यातीपर्यंत संजीवकांचा योग्य त्या अवस्थेत योग्य त्या प्रमाणत वापर करणे आवश्यक आहे. द्राक्षाच्या दर्जेदार उत्पादनासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी संजीवकांचा वापर करत आहेत परंतु योग्य माहिती अभावी योग्य त्या अवस्थेत, योग्य त्या प्रमाणात वापर न केल्यामुळे व अतिवापरामुळे अन्य वाईट परिमाण दिसून येतात.

द्राक्षाची गुणवत्ता ही मण्यांच्या आकारातील व रंगातील एकसारखेपणा, मण्यामधील साखर-आम्लता प्रमाण व मण्यांची साठवणक्षमता यावर अवलंबून असते. हे सर्व घटक अपेक्षेप्रमाणे निर्माण होण्यासाठी संजीवकांचा वापर करणे अनिवार्ह आहे.

गुणवत्तेसोबतच इतर कार्यांसाठी (डोळे फुटून येण्यासाठी, घड जिरू नये, इ.), तसेच साठवण करताना मणीगळ नियंत्रित करण्यासाठी सुद्धा संजीवाकांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे द्राक्षबागेत वेलीच्या छाटणीनंतर हायड्रोजन सायानामाईड, जिब्रेलिक आम्ल, सीपीपीयु (फोरक्लोरोफेन्युरॉन), नेप्थालिक अ‍ॅसिटीक आम्ल, इ.चा वापर विविध अवस्थांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.

द्राक्षबागेत फळ छाटणीनंतर हायड्रोजन सायानामाईडचा वापर फळ छाटणीनंतर वेलीवरील काड्यांची एकसारखी फूट निघण्यासाठी करतात. एकसारखी फूट निघण्यासाठी एकसारखी जाडीची काडी असणे व काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायानामाईडचे पेस्टिंग करणे या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.

काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायानामाईडचा वापर :
काडीची जाडी हायड्रोजन सायानामाईडचे प्रमाण

(१ लिटर पाणी)
१ लि. हायड्रोजन सायानामाईड किती लिटर पाण्यात वापरावे
६ मि.मी. ४० मि.लि. २५ लिटर
८ मि.मी. ५० मि.लि. २० लिटर
१० मि.मी. ६० मि.लि. १६.७ लिटर
१२ मि.मी. ८० मि.लि. १२.५ लिटर

हायड्रोजन सायानामाईडचा योग्य वापर होण्यासाठी ते द्रावण काडीच्या डोळ्यांना व्यवस्थित लावणे आवश्यक असते. द्रावणात लाल रंग वापरून रसायनाची लावणी योग्यरीत्या होत असल्याची खात्री करता येते.
ज्या व्यक्तींना हायड्रोजन सायानामाईडची एलेर्जी आहे त्यांणी पेस्टिंगचे काम करू नये.
पेस्टिंग करण्यापूर्वी हातांना पेट्रोलियम जेली, एरंडेल तेल किंवा व्हेसलीन व रबरी हातमोजे घालूनच या द्रावनाचा वापर करावा.
हायड्रोजन सायानामाईडच्या बाटलीसोबत वापरासंबंधी दिलेल्या सुचानांचे तंतोतंत पालन करावे.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम