शेतीपूरक व्यवसाय : मधमाशी पालन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | फळे, भाजीपाला पिकांच्या परागीकरणात मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. मधमाशीपालनाकडे पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांचा कल वाढवण्याकरिता शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील काही योजनांना अनुदानसुद्धा दिले जाते.

मधमाशीपालनाचे फायदे –

पर्यावरणाचा समतोल राखून नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा आहे.
अनेक पिकामध्ये मधमाश्‍यांद्वारे परागीकरण झाल्यामुळे उत्पादन वाढते.
मधासोबतच मेणाचेही उत्पादन मिळते. सौंदर्यप्रसाधने, अनेक प्रकारची अाैषधे तयार करण्यासाठी मध आणि मेणाचा उपयोग केला जातो.
कमी खर्चात गाव पातळीवर रोजगार मिळवून देणारा हा उद्योग अाहे.
मधमाशीपालन शेती, फळबाग, भाजीपाला लागवड व कोणत्याही पूरक उद्योगाशी स्पर्धा करत नाही.
जागा, वीज, वाहन, इमारत अशा भांडवलाच्या गुंतवणुकीची गरज नसते.

मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य –

मधमाश्‍यांसाठी लागणारी पेटी – जंगली लाकडाची साधी पेटी – १५०० रु.
– सागवानी लाकडाची पेटी – २७०० रु.
पोळी – १५०० रु. प्रतिपोळी
एकत्रित पेटी (पेटी + मधमाश्‍या पोळी) – ४००० रु. प्रतिपेटी
मधयंत्र – ४००० ते १०००० (गाल्व्हनाईज्ड)
धुरड – धुरडचा उपयोग मधमाशा आपल्याला चाऊ नयेत यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
कापड किंवा नेट – मधमाश्‍यांच्या दंशापासून डोळे व नाकाचा बचाव करण्यासाठी कापड किंवा नेटचा उपयोग करता येतो.
सुरी – पट्ट्या सैल करण्यासाठी आणि मधाची पोळी कापण्यासाठी सुरी वापरतात.
पिस – मधमाश्‍यांना पोळ्यापासून वेगळे करण्यासाठी.

मधमाशी पालनासाठी आवश्‍यक बाबी –

मधमाशी पालनासाठी मधमाशांच्या योग्य जातीची निवड करावी.
मधमाशांना पराग, मकरंद देणाऱ्या वनस्पतींची मुबलक प्रमाणात उपलब्धता असावी व त्यांच्या फुलोऱ्याचे सातत्य असणेसुद्धा आवश्‍यक आहे.
मधमाशी पालनासाठी आवश्‍यक तंत्रांचे प्रशिक्षण असणे आवश्‍यक आहे.
मध पेट्या आणि मध यंत्र यांचा मागणीनुसार पुरवठा असावा आणि त्यांना हाताळण्याचे तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे आहे.
मधाची उत्तम प्रत असणे आवश्‍यक आहे.
मध आणि मेण विक्रीसाठी बाजारपेेठेची जवळच उपलब्धता असावी.
मधमाश्‍यांची वाहतूक संध्याकाळी किंवा रात्री करावी.
पेट्या शक्‍यतो विद्युतवाहक तारा नसलेल्या ठिकाणी ठेवाव्यात.

मधमाश्‍यांच्या प्रजाती –

भारतीय माशी (ॲपिस सेरेना इंडिका)
युरोपियन माशी (ॲपिस मेलिपेरा)
आग्या माशी (ॲपिस डॉरसेटा)
लहान माशी (ॲपिस फ्लोरिआ)

या मधमाश्‍यांपैकी भारतीय माशी आणि युरोपियन माशी पेटीत पाळता येतात.

परागीभवनामुळे लाभ होणाऱ्या भाज्या, फळे आणि फुले –

भाज्या – कांदा, कोबी, मुळा, शेवगा, दोडका, कारली, काकडी, भोपळा, गाजर इ.
फळे – डाळिंब, संत्री, पेरू, स्ट्राॅबेरी, काजू, नारळ, लिंबू इ.
फुले – शेवंती, झेंडू, होलिहोक, ॲस्टर इ.
पिके – मोहरी, सूर्यफूल इ.

मधपेट्या ठेवण्याची वेळ –

paid add

फळबागेतील व फळभाज्या पिकातील फुलोरा ५ ते १० टक्के झाल्यानंतर शेतामध्ये पेट्या ठेवाव्यात.
एक हेक्‍टर पिकासाठी अंदाजे ३ भारतीय माश्‍यांच्या किंवा २ युरोपियन माश्‍यांच्या मधपेट्या ठेवाव्यात.

मधमाशी पालनास उपयोगी वनस्पतींची लागवड –

शेवगा, रिठा, निलगिरी, सावर या वनस्पती लावल्यास मधमाश्‍यांना वर्षभर अन्नाचा पुरवठा होतो.
शेतामध्ये जवळपास मका नेहमी फुलत राहील अशा प्रकारे मका पेरल्यास मधमाशी पालनास फायदा होतो.

कीडनाशकांपासून मधमाश्‍यांचे संरक्षण –

कीडनाशकांचा योग्य त्या ठिकाणीच वापर करावा.
प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल, तर फवारणी सूर्यास्तानंतर करावी.
मधमाश्‍यांना हानी होणार नाही अशा कीडनाशकांचा वापर करावा.
पेटी जवळपास फवारणी करू नये.
शक्‍य नसल्यास पेटीवर पोते ठेवावे किंवा पेट्या कमीत कमी २ ते ३ कि.मी. अंतरावर ठेवाव्यात.
फवारणीच्या काळात मधमाश्‍यांना साखरेचा पाक द्यावा.
पेटीतील हवा योग्य प्रकारे खेळती राहील याकडे लक्ष द्यावे.

वसाहतींचे व्यवस्थापन –

मधाच्या पोळ्यांची तपासणी शक्‍यतो सकाळी मधाच्या हंगामामध्ये आठवड्यामधून किमान एकदा करावी.
पोळ्याची स्वच्छता योग्य प्रकारे राखणे आवश्‍यक आहे.
मधमाश्‍यांची संख्या आणि वाढ पाहण्यासाठी वसाहतीची नियमित देखरेख करावी.
मधमाशा पेटी ठेवताना चारही पायाखाली पाण्याने भरलेली वाटी ठेवावी. जेणेकरून पेटीत मुंग्या जाणार नाही.

अनुत्पादन काळातील व्यवस्थापन –

ज्येष्ठ माशांना काढून सुदृढ नव्या माशांना ब्रूड चेंबरमध्ये नीट बसवावे.
आवश्‍यक वाटल्यास विभाजन बोर्ड बसवावा.
भारतीय मधमाश्‍यांसाठी २०० ग्राम साखर प्रतिआठवडा प्रतिवसाहत या दराने साखर सिरप द्यावा.
मधमाश्‍यांच्या सर्व वसाहतींना एकाच वेळी अन्न द्यावे.

मध उपलब्ध काळातील व्यवस्थापन –

वसाहतीमध्ये मधमाशा पुरेशा प्रमाणात ठेवाव्यात. मधमाश्‍यांची जास्त गर्दी होऊ देऊ नये.
राणी माशीला ब्रूड चेंबरमध्येच ठेवण्यासाठी ब्रूड आणि सुपर चेंबर यांच्या दरम्यान राणीला वेगळे करण्याच्या शिट्‌स ठेवाव्यात.
वसाहतीची वेळोवेळी तपासणी करावी.
मधाने पूर्ण भरलेल्या फ्रेम सुपरच्या बाजूने काढून घ्याव्यात.
पूर्णतः बंदिस्त पोळी मध काढण्यासाठी बाहेर काढावी. मध काढून घेतल्यानंतर सुपरमध्ये परत ठेवावीत.
मधाने पूर्णपणे भरलेले व रंगाने हलके असलेले पोळे तयार झाले म्हणून ओळखावे.

मधाची काढणी –
पोळ्याच्या ज्या भागातून मध काढायचा आहे, त्या भागातील मधमाशांना धुरानं दूर करावं आणि पोळी कापून घ्यावी.

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम