दुग्धोत्पादनासाठी म्हशीच्या मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी, सुरती जातींना मागणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १६ नोव्हेंबर २०२२ | दुग्धोत्पादनासाठी म्हशीच्या मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी, सुरती या जाती चांगल्या आहेत. निवड पद्धतीने म्हशीमध्ये सुधारणा करणे शक्‍य आहे. गोठ्यामध्ये मिळणाऱ्या म्हशींच्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते.

मुऱ्हा – शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण 3000 ते 3500 लिटर असते.
मेहसाणा – ही जात सुरती व मुऱ्हा जातींच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 3000 लिटरपर्यंत दूध देतात.

पंढरपुरी – सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम, पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. म्हशींचे वजन साधारण 400 किलो असते. पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात आणि 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकडकाळ, पहिल्या वेताचे कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातींत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देतात.
सुरती – शरीरबांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात. भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन 1800 लिटर असते. जास्त काळ दूध देते. दुधात स्निग्धांश जास्त प्रमाणात असतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम