शेतकऱ्याच्या मागणीची दखल : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केद्राला दिले पत्र !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ११ जानेवारी २०२३ । राज्यातील शेतकऱ्याच्या व सोयाबीन, कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकरी यांच्याशी केंद्र सरकारशी निगडीत असलेल्या मागण्यांसदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना पत्र पाठवले आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली. रविकांत तुपकर यांनी नमुद केलेल्या महत्वपूर्ण बाबी या पत्रात दिल्या आहेत. यासंदर्भात तुपकरांनी मुंबईत फडणवीसांची भेट घेतली होती.

हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन तुपकरांनी कापूस आणि सोयाबीनप्रश्नी पाठपुरावा केला होता. तर पुन्हा एकदा 9 जानेवारीला मुंबई येथे उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. कापूस-सोयाबीनच्या भावाबाबत केंद्राशी चर्चा करण्याबाबतची आग्रही मागणी तुपकरांनी केली होती. त्यानंतर फडणवीसांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना पत्र लिहलं आहे.

महाराष्ट्रात 70 टक्के शेतकरी हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक आहेत. सोयाबीनला प्रति क्विंटल 5 हजार 800 तर कापसाला प्रति क्विंटल 8 हजार 200 रुपये उत्पादन खर्च लागतो. परंतु सध्या खासगी बाजारात सरासरी सोयाबीनला प्रति क्विंटल 5 हजार 600 रुपयांचा आणि कापसाला प्रति क्विंटल 9 हजार रुपयांचा दर आहे. खासगी बाजारात मिळणारा भाव हा फक्त उत्पादन खर्चाची बरोबरी करतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळावा यासाठी केंद्राने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. या संदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काही मागण्या आणि सूचना नमुद केल्या आहेत, त्याबद्दल निर्णय झाल्यास महाराष्ट्रातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, असे फडणवीसांनी या पत्रात नमुद केलं आहे. यासाठी कापूस आणि सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करु नये, यंदा 15 लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क 30 टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क सध्या 11 टक्के आहे ते तसेच कायम ठेवावे, जी.एम. सोयाबीनच्या लागवडीला परवानगी द्यावी, सोयाीबनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा व पिककर्जासाठी सिबीलची अट रद्द करावी, आदी मागण्या फडणवीसांनी या पत्रात नमुद केल्या आहेत.

फडणवीसांनी पियूष गोयल यांनी पाठवलेल्या पत्रात रविकांत तुपकर यांचा नामोल्लेख केला आहे. तुपकरांच्या सुचनांचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा, असेही फडणवीसांनी म्हटले आहे. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना लेखी पत्र पाठवणे शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची फलश्रृती आहे. जर राज्य सरकारने केंद्राकडे या मागण्यांबाबत ताकदीने पाठपुरावा केल्यास सोयाबीन-कापूस उत्पादकांना केंद्राकडून न्याय मिळू शकतो, अशी शेतकऱ्यांना अशा असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम