अशी करा शेंगवर्गीय भाजीपाला लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ |शेंगवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये गवार, श्रावण घेवडा, चवळी, वाल आदी भाजीपाला पिकांचा समावेश होतो. उन्हाळी हंगामात त्यांच्या लागवडीसाठी पोषक हवामान असते. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात या भाजीपाला पिकांची लागवड पूर्ण करून घ्यावी.

शेंगवर्गीय भाजीपाला पिकांच्या कोवळ्या शेंगांचा भाजीसाठी वापर होतो. वाळलेल्या बियांचा उसळ किंवा डाळीसाठी उपयोग केला जातो. त्यामुळे त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.

सुधारित जाती :

श्रावण घेवडा : कंटेंडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, कोकण भूषण.
गवार : पुसा सदाबहार, पुसा नवबहार, मोसमी.
चवळी : पुसा फाल्गूनी, पुसा बरसाती, अर्का गदिमा, पुसा दोफसली.
वाल : अर्का जय, अर्का विजय, वाल कोकण १.

लागवड तंत्रज्ञान :
शेंगवर्गीय भाजीपिकांची लागवड प्रामुख्याने बियांची पेरणी करून किंवा टोकण पद्धतीने केली जाते.

लागवड अंतर व बियाणे प्रमाण
शेंगवर्गीय भाजीपिके लागवडीचे अंतर (सेंटीमीटर) प्रति हेक्टरी बियाणे (किलो)
श्रावण घेवडा
झुडूपी जाती
वेली जाती ३० x १५
६० x ३० ४०-५०
२५-३०
गवार ४५ x १५ १५-२०
चवळी ४५ x ३० १५-२०
वाल ९० x ९० २०-३०

गवार :

लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. मात्र पोयट्याची, उत्तम निचऱ्याची आणि सामू ७ ते ७.५ असलेल्या जमिनीत चांगले उत्पादन मिळते.
उन्हाळी हंगामात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत पेरणी करावी.
गवारीच्या कोवळ्या शेंगा जातीनुसार साधारणपणे ६ ते ८ आठवड्यांत तोडणीला येतात. शेंगाची ३ ते ४ दिवसांच्या अंतराने नियमित तोडणी करावी. शेंगा जाड होण्यापूर्वीच तोडाव्यात.
प्रतिहेक्‍टरी साधारणपणे ४ ते ७ टन उत्पादन मिळते.

श्रावण घेवडा :

लागवडीसाठी हलकी ते मध्यम पोयट्याची जमीन निवडावी.
पूर्वमशागत केल्यानंतर प्रतिहेक्‍टरी २५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.
उन्हाळी लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत करावी.
कोवळ्या शेंगाची तोडणी करावी. अर्का कोमल जातीच्या शेंगाची पहिली तोडणी पेरणीपासून ४५ दिवसांनी सुरू होते.
प्रतिहेक्‍टरी साधारणपणे ३ ते ४ टन इतके उत्पादन मिळते.

वाल :

लागवडीसाठी हलकी ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
उन्हाळी लागवड जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पुर्ण करावी.
भाजीसाठी कोवळ्या शेंगा काढाव्यात. शेंगा वाळलेल्या असल्यास त्यांच्यातील दाणे काढून ते भाजीसाठी वापरतात.
बुटक्‍या जातीच्या शेंगांचे प्रतिहेक्‍टरी ५ ते ७ टन उत्पादन मिळते; तर उंच वेतीसारख्या जातींमध्ये शेंगाचे प्रतिहेक्‍टरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळते.

चवळी :

चवळीच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी.
पूर्वमशागत करून प्रतिहेक्‍टरी २५ टन शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.
उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी; तसेच लागवडीसाठी सरी वरंब्यांचा वापर करावा.
चवळीचे प्रतिहेक्‍टरी ५ ते ८ टन हिरव्या शेंगांचे उत्पादन मिळते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम