ससेपालन : शेतीला पूरक जोडधंदा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ |काही वर्षांपूर्वी ससा हा जंगलामध्ये किंवा शेतांमध्ये आढळत होता. ससा पाळणे हे त्यावेळी दुर्मिळ होते. परंतु सद्यस्थितीत मांसासाठी ससेपालन हा जोडधंदा म्हणून करण्यात येत आहे. शेतीवर उपजीविका करणाऱ्यांची वाढलेली संख्या (परंतु शेतीच क्षेत्रफळ तेवढेच), शेतीचे कमी व अनियमित उत्पादन, कमी भाव यामुळे बरेच शेतकरी, शेतमजूर जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करीत आहेत.
शेतीसोबत शेतकरी बांधव गाई व म्हैस पालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, इ. जोड धंदे करत आहेत. परंतु अत्यल्प गुंतवणूक खर्चात, कमी जागेत व थोड्याशा श्रमात जास्त फायदा मिळणारा व्यवसाय म्हणून ससेपालन हा जोडधंदा करण्याकडे काळ वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत बऱ्याच ससेपालन संस्था, फार्म्स उभारण्यात आले आहेत. काही संस्था हा नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी प्रक्षिशण देतात. तसेच उद्यागासाठी सर्व सामुग्री व ससेही पुरवतात. ससेपालन हा व्यवसाय करताना आवश्यक अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती सदर लेखात देत आहे.

ससेपालन व्यवसायाचे महत्त्व :
वाढत्या लोकसंख्येला मांसाची आवश्यकता व मागणी वाढली असून देशांतर्गत मांस उत्पादन तोकडे पडत आहे. ढोबळमानाने देशात मांस उत्पादन आणखी चार ते पाच पटीने वाढण्याची आवश्यकता आहे. कमी पडत असलेल्या मांसाची गरज भागविण्याकरिता कमीत कमी वेळेत जास्त मांस उत्पादन करणारे प्राणी व भारतासारख्या विकसनशील देशात माणसांच्या अन्नाशी स्पर्धा न करता जगणारे प्राणी म्हणून ससा हा अत्यंत उपयुक्त प्राणी आहे. सश्याच्या दोन पिढीतील अंतर ६ ते ८ महिने असते व एका वेळेस सश्याची मादी ५ ते १० किंवा त्यापेक्षा जास्त पिल्ले देते.
याशिवाय सश्याच्या मांसाला एक प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण चव असून हे मांस रुचकर असल्यामुळे मांसभक्षक वर्गात याला भरपूर मागणी आहे.

सश्याच्या विविध जाती व राहण्याची व्यवस्था :
ससा हा मुळचा युरोपातील प्राणी असून; आता त्याचे जगभर उत्पादन सुरु झाले आहे. न्यूझीलंड व्हाईट, न्यूझीलंड ब्लेक, ग्रे व्हाईट, रशियन चिंचीला इ. जातीचे ससे सध्या पाळण्यासाठी उपलब्ध आहेत. ससेपालनासाठी लोखंडी पिंजरे योग्य असतात. सश्यांना पिंजऱ्यात खाद्य योग्यप्रकारे देता येते तसेच त्यांची वाढ बारकाईणे लक्षात येते. याबरोबर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. हल्ली सश्यांचे युनिट किंवा जोडी पुरवितात ते केंद्रे हे पिंजरे उपलब्ध करून देतात.

paid add

प्रजनन व संगोपन :
फायदेशीर व्यवसायाकरिता सश्यांचे प्रजनन सतत चालू असले पाहिजे व ४० टक्के माद्या प्रत्येक महिन्याला गाभण राहणे आवश्यक असते. सश्यांचा प्रजनन कालावधी कमी असतो आणि मादी एका वेळेस ५ ते १५ पिल्ले देते. जन्मल्यानंतर ससे ४ ते ६ महिन्यांत प्रजननक्षम होतात. प्रजननासाठी वयात आलेली मादी नराच्या पिंजऱ्यात समागमानासाठी सोडावी. मादीमध्ये ऋतूचक्र १६ दिवसांचे असते, पैकी १२ दिवस मादी माजावर असते. माजावर असलेली मादी नराच्या पिंजऱ्यात सोडावी या उलट कधी करू नये. संभोगानंतर मादीला पुन्हा नरापासून दूर ठेवावे. संभोगानंतर साधारणपणे १५ दिवसांनी मादी गाभण आहे किंवा नाही हे ओळखता येते. पिल्लांना जन्म देण्याअगोदर २ ते ४ दिवस आधी मादीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. पिल्ले झाल्यानंतर स्वच्छ करून आईचे दुध पाजून एका खोक्यात; पिंजऱ्यात ठेवावे. साधारणपणे ४० ते ४५ दिवसांनी पिल्लांना आई पासून दूर करावे. त्यानंतर ते आहार (खाद्य, हिरवा पाला) खावू लागतात. जन्मानंतर तीन महिन्यांनी सरासरी वजन दीड ते दोन किलोग्रॅम व सहा महिन्यात तीन ते साडे तीन किलो ग्रॅम होते. तीन महिन्यानंतर ससे मांसासाठी योग्य होतात व एका सश्यापासून एक ते दीड किलो ग्रॅम मांस मिळते. एका वर्षात एक मादी पाच ते सहा वेळा पिल्लांना जन्म देते. म्हणजेच साधारणपणे एका वर्षात एका मादीपासून ३५ ते ४० पिल्ले मिळू शकतात. सश्यांसाठी २० ते ३५ अंश तापमान अत्यंत चांगले असते. पिंजरे किंवा त्यांची जागा हवेशीर व प्रकाशात असावी, हवामानातील आर्द्रता ६५ ते ७० टक्के पेक्षा जास्त नसावी.
सश्यांच्या कातडीमध्ये घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथी नसतात, तसेच शरीरातील तापमान कमी करण्याची योजना नसते. वरील कारणामुळे उष्ण वातावरणात ससेघरात पंख्याची व्यवस्था करावी. साधारणपणे मादीसाठी १३ तास व नरांसाठी दिवसभराचा प्रकाश पुरेशा असतो. कमी प्रकाशाच्या जागी प्रकाश व्यवस्था करावी.

संतुलित आहार :
ससा हा शाकाहारी असल्यामुळे त्याला लासुनात, बरसीम हा प्रथिनयुक्त चारा तसेच, पालक, पण कोबी, इ. पालेभाज्या. गव्हाचा कोंडा, स्वयंपाकघरातील उरलेले अन्न व भाजीपाल्याचा टाकाऊ भाग द्यावा. आहारात प्रथिने मिळण्यासाठी सोयाबीन किंवा भूईमुगाची ढेप द्यावी. साधारणपणे एका सश्याला १०० ग्रॅम खाद्य व ६० ते १०० ग्रॅम हिरवा पाला आहारात द्यावा. दिवसभरात स्वच्छ, मुबलक पाणी द्यावे. सश्यांना मुळा, कांदा, बटाटा, शेंगदाणे, लसूण व गाजर गवत देऊ नये.

व्यवसायातून आर्थिक लाभ :
सश्यांचे एक युनिट (चार नर व सहा माद्या), पिंजरा, कटोऱ्या, औषधे (उपयोगी) हे ससेपालन केंद्रात विकत मिळतात. साधारणपणे एका युनिटपासून १६० ते १८० पिल्ले मिळतात व २५ ते ३० टक्के मृत्युदर पहाता, ११० ते १२० पिल्ले विक्रीकरिता उपलब्ध होतात. प्रौढ ससे योग्य वेळेत कळपातून काढावे लागतात. तीन ते चार महिन्यापासून मांसासाठी विक्री करता येते. तसेच मेलेल्या सश्यांच्या चामड्यापासून व खतापासुनही चांगले उत्पन्न मिळते. विक्रीसाठी चांगली भावाने विक्री करावी.

 

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम