रब्बी ज्वारीची खान्देशात ६० हजार हेक्टरवर पेरणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० नोव्हेंबर २०२२ | खानदेशात यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र सुमारे आठ हजार हेक्टरने वाढले आहे. सुमारे ६० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरवर्षी ४५ ते ५२ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी केली जाते. पारंपरिक दादर (कोरडवाहू) ज्वारीची पेरणीदेखील कायम आहे. यातच कृत्रीम जलसाठाधारकांनी संकरित, विद्यापीठांकडून संशोधित ज्वारीची पेरणी केली आहे.

मका, गहू पिकाऐवजी या ज्वारीकडे शेतकरी वळले आहेत. ज्वारीपासून सकस चारा व चांगले धान्यही मिळते. दादर किंवा रब्बी ज्वारीचे उत्पादनही चांगले येते. त्याला सर्वत्र मागणी असते. मागील दोन हंगामात कोविडचा फटका ज्वारी पिकाला बसला. परंतु पुढे दरांत मोठा फटका बसणार नाही, असे गृहीत धरून अनेकांनी ज्वारीची पेरणी केली आहे. मागील दोन हंगामात ज्वारीचे दर प्रतिक्विंटल सरासरी १८०० रुपये एवढेच मिळाले. पण पुढे दर २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक मिळतील, अशी अपेक्षा आहे.

तसेच शासनाकडूनही खरेदीची घोषणा होईल. यामुळे ज्वारीची पेरणी यंदा बऱ्यापैकी वाढली आहे.ज्वारीची पेरणी खानदेशात धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, जळगाव, चोपडा आदी भागात केली आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेक नदीकाठी ही पेरणी अधिक दिसत आहे.यामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. काही शेतकरी अजूनही संकरित ज्वारीची पेरणी करीत आहेत. भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, जळगाव आदी भागात संकरित ज्वारी अधिक असणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम