कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ | सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला गती आली असली तरी करडई, सूर्यफूल या पिकांचा पेरा घटला आहे. तर गहू आणि हरभरा पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी नियोजन करत असून या पिकांच्या पेरणीला गती आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार ६६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पलूस तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ९०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९६१ हेक्टर आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी नियोजन सुरू केले. ऑक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी पुढे आले. मूळात, जत तालुक्यात आगाप ज्वारीच्या पेरणीस प्रारंभ केला.
त्यानंतर आटपाडी, कवठे महांकाळ तालुक्यातील शेतकरी ज्वारीच्या पेरणीसाठी पुढे आले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८७ हजार २१८ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला होता. त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला गती आली. अर्थात या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ५० हजार ४७७ हेक्टर पेरणी उरकली आहे.
जिल्ह्यातील जत तालुक्यात प्रामुख्याने करडईचे पीक घेतले जाते. परंतु यंदाच्या हंगामात अवघ्या ०.४ हेक्टरवर करडईचा पेरा झाला असून करडईच्या क्षेत्रात घट झाली आहे. तसेच सूर्यफूल पीक सर्वच तालुक्यांत शेतकरी घेतात. परंतु अद्याप सूर्यफूल पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी पुढे आला नसल्याचे चित्र आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम