हिवाळ्यात अशी घ्या शेळ्यांची काळजी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १८ नोव्हेंबर २०२२ | हिवाळ्यात साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात शेळ्यांचे विण्याचे प्रमाण हे जास्त असते आणि याच काळात थंडीमुळे करडांचे मरतुकीचे प्रमाणही मोठे असते. या काळात विशेष काळजी घेतल्यास ऊत्पादनामध्ये हमखास वाढ होते.

हिवाळ्यात शेळ्यांचा गोठा कोरडा व हवेशीर राहील याची दक्षता घ्यावी.
गोठ्याची दिशा दक्षिण-उत्तर अथवा पूर्व-पश्‍चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो.
पशुतज्ञांच्या सल्ल्यानुसार व शिफारशीनुसार जंतुनाशकांची फवारणी करून गोठा निर्जंतुक ठेवावा.
वयोमानाप्रमाणे शेळ्यांची/बोकडांची आणि लहान करडांची स्वतंत्र व्यवस्था करावी.
हिवाळ्यात गोठा उबदार असावा. कारण शरीराचे तापमान कमी होऊन करडे आजारी पडण्याची शक्‍यता असते.
गोठ्याची दारे, खिडक्‍या आणि गोठ्याच्या फटी गोणपाट, रिकामे पोते किंवा ताडपत्रीच्या साह्याने व्यवस्थित बंद करावीत. जेणेकरून करडांना थंड हवा लागणार नाही.
गोठ्याची दिवसातून दोन ते तीन वेळेस स्वच्छता करावी. करडांना सकाळी कोवळ्या उन्हात दोन ते तीन तास मनसोक्त बागडू द्यावे.
बंदिस्त पालनात गोठ्यात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सिमेंटच्या अर्धगोल पाइपद्वारे करावी.
करडांना हिवाळ्यात स्वच्छ कोमट पाणी पिण्यासाठी दिल्यास त्यांची मूत्रसंस्था सुस्थितीत राहण्यास मदत होते.
थंडीच्या दिवसांत (हिवाळ्यात) करडं साधारणपणे फुफ्फुसदाह (न्यूमोनिया) या रोगाला बळी पडतात. हा रोग प्रामुख्याने कोंदट – दमट वातावरण, ओलसरपणा, अस्वच्छता यामुळे पसरतो. यासाठी करडांच्या गोठ्यातील हवा खेळती राहील व भरपूर सूर्यप्रकाश राहील याची काळजी घ्यावी.
गोठ्यात भाताचा पेंढा, बाजरीचे सरमाड व गोणपाट पसरून उबदार अंथरूण करावे.
गोठा उबदार राहण्यासाठी त्यात शंभर वॉटचा बल्ब सोडावा. जास्त थंडी असल्यास गोठ्यात शेकोटी पेटवावी.
करडांना जन्मल्यापासून एक तासाच्या आत चीक द्यावा. दिवसातून तीनदा विभागून असाच चीक पाजावा.
आजारी करडांना वेगळे करून पशुवैद्यकाकडून त्वरित उपचार करून घ्यावेत.
शेळ्यांच्या आहाराचे योग्य नियोजन ठेवावे. शेळीच्या वजनाच्या किमान अर्धा टक्का खुराक द्यावा.
चारा १.५ ते २ सें.मी.चे तुकडे करून दिल्यास ३० टक्के चाऱ्यात बचत होते.
वेळापत्रकाप्रमाणे शेळ्यांना व करडांना लसीकरण करावे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम