कृषी सेवक I २२ डिसेंबर २०२२ I वसंत सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या अनियमितता व गैरव्यवहाराच्या तक्रारीच्या स्थगित चौकशीला सहकार मंत्र्यांच्या दालनात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान कलम ८३ नुसार हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आता पुन्हा ‘वसंत’च्या तत्कालीन संचालक मंडळाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वसंत सहकारी साखर कारखान्यामध्ये गैरव्यवहार, बेकायदेशीर कामकाज व अनियमिततेबाबत चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध कठोर कार्यवाही करावी, यासाठी संस्थेचे सभासद विलास चव्हाण, पी. डी. देशमुख, गजानन लोखंडे व रामराव कदम यांनी प्रादेशिक सह संचालक साखर अमरावती व शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याच्या चौकशीसाठी विशेष लेखा परिक्षक वर्ग-१ सहकारी संस्था साखर अमरावती यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.
त्यांच्याकडून थातूर-मातूर चौकशी केल्याचा आरोप झाल्यानंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दिग्रस यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झालीया गैरव्यवहाराची कलम ८३ नुसार चौकशी सुरू असताना त्यावर तत्कालीन संचालक मंडळाने आक्षेप घेऊन चौकशीला स्थगिती मिळविली. या प्रकरणावर सहकारमंत्री अतुल सावे यांच्या दालनात १३ डिसेंबर रोजी पुनरिक्षण अर्जावर सुनावणी झाली. त्यानंतर या प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाच्या मागणीनुसार पुनरिक्षण अर्ज नामंजूर करण्यात आला.
कारखानाच्या भंगार विक्री व इतर अनियमितता बाबतच्या कलम ८३ ची चौकशी कायम ठेवण्याचा निर्वाळा देण्यात आला. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम