कृषी सेवक I २२ डिसेंबर २०२२ I सततच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीपोटी ३५०० कोटींचे प्रस्ताव आले आहेत. त्या शेतकऱ्यांना एक महिन्यांच्या आत मदत मिळेल. तसेच पुढील वर्षीपासून सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचे निकष ठरवले जातील. त्यानुसार मदत मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
अंबड बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील बावणेपांगरी, शेलगाव आणि रोषणगाव या महसूल मंडलांत अतिवृष्टीच्या निकषांतून अनेक गावे वगळली आहेत. अनेक ठिकाणी पंचनामेही झाले, पण त्यापोटी मदत मिळालेली नाही, अशी लक्षवेधी सूचना कुचे यांनी मांडली होती.
एक तास झालेल्या चर्चेत सर्वच विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी अतिवृष्टी, ‘एनडीआरएफ’चे निकष, सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीपोटी मदत मिळाली नसल्याच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
यावर सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचे निकष ठरविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी समिती नेमली आहे, असेही सांगण्यात आले.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम