अशी करा आंबा लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १२ नोव्हेंबर २०२२ | शेतकरी केशर आंबा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात करत आहेत. जर आपण शिफारशीत आंबा लागवड अंतराचा विचार केला तर ते दहा बाय दहा मीटर आहे. परंतु आता घन लागवड पद्धत पुढे येत असून यामध्ये पाच बाय पाच मीटर किंवा 5 बाय सहा मीटर या अंतरावर आंबा लागवड करणे जास्त फायद्याचे दिसून येत आहे. या अंतरावर दोन झाडांमधील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नसल्यामुळे तो पर्यंत आपण या बागेतून दुप्पट ते तिप्पट उत्पन्न मिळवू शकतो.

समजा आपण पारंपारिक दहा बाय दहा मीटर अंतरावर आंबा लागवड केली तर प्रति हेक्टर 100 झाडे लागवड केली जातात.

परंतु जर लागवड पद्धतीचा विचार केला तर यामध्ये हेक्टरी 400 झाडांची संख्या ठेवता येऊ शकते. दुसरे महत्त्वाचा फायदा म्हणजे झाडांचा घेर आणि उंची यामध्ये मर्यादित ठेवता येते. यासाठी शेतकरी बंधू छाटणी आणि वाढ निरोधकांचा वापर करू शकतात.

कलम लावून लागवड :

जागेवर कोयी लावून जशी लागवड करता येते, तशीच 10 ते 12 महिने वयाच्या हव्या त्या जातीचीपण खात्रीची कलमे लावूनसुद्धा आंबा लागवड करता येते. अशा वेळी कलमे लावताना कलमाभोवती तीन कोयी लावाव्यात आणि पुढे योग्य वेळी म्हणजे सप्टेंबर – ऑक्‍टोबर किंवा फेब्रुवारीत त्याच कलमास जोड द्यावा, असे केल्यास कलमास अनेक मुळांची ताकद मिळते.

कलमांची निगा :

प्रत्येक खड्ड्यावर पाऊसमान पाहून सप्टेंबरच्या पहिल्या – दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस संपताच कुठल्याही काडी-कचऱ्याचे किंवा उसाच्या पाचटाचे वीतभर उंचीचे रोपाभोवती आच्छादन करावे. त्यावर थोडी माती टाकावी. आच्छादन करताना त्यात थोडी लिंडेन पावडर टाकणे गरजेचे आहे. कलमे केल्यानंतर किंवा तयार कलमे लावल्यानंतर गावठी रोपावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकणे महत्त्वाचे असते. पावसाचा अंदाज पाहून पावसाळ्यात व जरुरीप्रमाणे वर्षभर कलमास पाणी द्यावे. साधारणपणे पहिले वर्षभर दर 20 दिवसांच्या अंतराने 10 ग्रॅम युरिया आळ्यातील मातीत मिसळून दिल्यास कलमांच्या वाढीला मदत मिळते.

कलमांचे भटक्‍या जनावरांपासून संरक्षण करावे. कलमांना आधार द्यावा. कलमांच्या दोन्ही बाजूंस दोन काड्या लावून त्यावर दोन आडव्या सैल बांधून घ्याव्यात. उन्हाळ्यात कलमांना सावली करावी. कलमी फांद्यांवरील मोहर वेळोवेळी काढावा, आळ्यातील तण वेळोवेळी काढीत जावे. दुसऱ्या वर्षी पाऊस पडताच शिफारशीप्रमाणे शेणखत व रासायनिक खत देऊन तीन ते चार वर्षांपर्यंत झाडांची चांगली वाढ होऊ द्यावी. जमिनीपासून सुमारे तीन फूट उंचीपर्यंत कलमांवरील बाजूच्या फांद्या काढून टाकाव्यात. वेळोवेळी नवीन फुटीवर येणाऱ्या रोग व किडींपासून संरक्षण करावे. फळ बागेस पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करावी. ठिबक सिंचनाद्वारे प्रति हंगामाप्रमाणे सात-आठ प्रति दिन लिटर पाणी द्यावे. फळातील बागेस मात्र 70 ते 80 लिटर पाणी दररोज द्यावे. पहिली दोन वर्षे कलमांना दररोज पाणी देण्याऐवजी दोन दिवसाआड पाणी द्यावे. म्हणजे मुळ्या खोलवर जातील.
खते

एक वर्ष वयाच्या झाडास १५ किलो कंपोस्ट खत, १५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद १०० ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून द्यावेत. दरवर्षी ही मात्रा समप्रमाणात वाढवून १० व्या वर्षापासुन प्रत्येक झाडास ५० किलो कंपोस्ट खत, १.५ किलो नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद व १ किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात द्यावे.

पाणी व्यवस्थापन

पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर ३ – ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

आंतरपिके

आंबा बागेत १० वर्षापर्यंत भाजीपाला, द्विदल, शेंगवर्गीय, धैंचा, ताग ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.

फळांची काढणी

आंबा फळे १४ आणे (८५ %) पक्वतेची काढावीत. यावेळी फळांना लालसर रंगाची छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट होतो तसेच फळांच्या देठानजीक खोलगट भाग तयार होतो. यावेळी फळांची विशिष्ट घनता १.०२ ते १.०४ एवढी असावी. फळांची काढणी देठासहित करावी. फळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चारनंतर काढावीत.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम