अखेर आ. कैलास पाटील यांचे उपोषण मागे

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आ. कैलास पाटील यांनी सातव्या दिवशी आज रविवारी उपोषण मागे घेतले . यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याचा निर्णय कैलास पाटील यांनी घेतला.

रविवार (ता.३०) आंदोलनाच्या सातव्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपोषणाला भेट दिली. त्यावेळी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे हजर होते. कैलास पाटील यांनी नारळ पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.

राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास पाटील यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा करण्यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जोवर पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत तोवर उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आ. पाटील यांनी घेतली होती. मात्र शासन आणि प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर आ. पाटील यांनी उपोषण मागे घेतले. आ. पाटील यांच्या उपोषणाची शासन आणि प्रशासनाकडून दखल घेण्यात आली होती.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम