वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १० डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास कृषी विभागामार्फत महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल महोदय यांचे हस्ते विविध कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे सन 2021 साठी कृषी विभागामार्फत नाशिक विभागातील शेतकऱ्यांकडून वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार हा कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात संघटनात्मक आणि अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास देण्यात येणारा कृषी क्षेत्रातील पुरस्कार आहे.

पुरस्काराचे स्वरूप – रु. 50,000 /- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह व सपत्नीक / पतीसह सत्कार देण्यात येणारे पुरस्कार संख्या – प्रत्येक कृषि विभागातुन एक याप्रमाणे राज्यातून- 08

पुरस्कारासाठीचे निकष –

1) प्रस्तावित शेतकरी यांना केंद्र किंवा राज्य शासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त झालेला असावा. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीयांसह त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा.

2) प्रस्तावित शेतकरी यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन व वापर, काढणी पश्चात व्यवस्थापन, साठवणूक व मूल्यवर्धन, कृषि प्रक्रिया, निर्यात इत्यादी कार्यात सहभागी होऊन परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा असावा.

3) शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष असावे

4) संबंधित शेतकरी केंद्र राज्य शासकीय निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसावा किंवा सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारा नसावा.

प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे

1) 7/12 व 8- अ चा उतारा

2) केंद्र राज्य शासकीय निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसले बाबत तसेच सेवानिवृत्ती वेतन व मानधन घेत नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र

3) मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला

4) संबंधित शेतकऱ्याला मिळालेले पुरस्कार व कृषी विषयक कार्य दर्शविणारे प्रमाणपत्रे इ.

5) पीकस्पर्धा, कृषी प्रदर्शने, संशोधन संस्थांना भेटी इ. उपक्रमात सहभागी झाल्या बाबत

तपशील

तरी वरीलप्रमाणे नाशिक विभागातील पात्र इच्छुक शेतकऱ्यानी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग ना‍शिक मोहन वाघ यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

नाशिक विभागातील मागील 3 वर्षातील वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार विजेते 1) समाधान दयाराम पाटील, उमरे ता एंरडोल जि.जळगांव – 2017

2) कारभारी महादु सांगळे, वडगाव ता. सिंन्नर जि नाशिक – 2018 ,

3) वाल्मिक आनंदराव पाटील, चांदे ता.जि. धुळे – 2018

4 नरेंद्र रावसाहेब भदाणे, सामोडे ता. साक्री जि. धुळे – 2019

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम