कृषी सेवक I १० डिसेंबर २०२२ I बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. यातच शुक्रवारी किमान तापमानात अचानक मोठी घट झाली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.३ अंश तापमानाची नोंद झाली.
राजस्थानातील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज पासून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.बंगालचा उपसागरात गुरुवारी (ता. ८) ‘मनडूस’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. पूर्व किनाऱ्याकडे झेपावत असलेली वादळी प्रणाली आज (ता. १०) सकाळपर्यंत पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी, श्रीहरिकोटा ते महाबलीपूरम दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
राज्यातही थंडी वाढल्याने निफाड, धुळे, औरंगाबाद, गोंदिया, पुणे, परभणी, नागपूर, नाशिक येथे किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला. तर सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३३.१ अंश तापमान नोंदले गेले. आजपासून (ता. १०) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम