सीताफळ कोरडवाहू फळझाडाची लागवड

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्रातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी ८५ टक्के जमीन कोरडवाहू आहे. या भागातील शेती उत्पादन कमी व अनिश्‍चित स्वरूपाचे असून, शेतीची पद्धत पारंपरिक आहे. विदर्भात सरासरी ७५० मि.मी. पाऊस पडतो, परंतु त्याचे योग्य वितरण होत नसल्याने पिकांचे उत्पन्न घटते आणि हलक्या जमिनीत पिकांचे १०० टक्के नुकसान संभवते. तेव्हा अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी अति उथळ व हलक्या जमिनीत पारंपरिक पिकाऐवजी कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी म्हणजे आर्थिक फायदा होईल. कोरडवाहू फळबाग लागवडपूर्वी जमिनीची बांधबंदिस्ती करावी.
कोरडवाहू फळपिकातील महत्त्वाचे पिक म्हणजे “सीताफळ”. सुमारे ६ ते ६·५० मीटर उंच असलेला हा पानझडी वृक्ष मूळचा उष्णकटिबंधीय अमेरिका व वेस्ट इंडीजमधील असून पंधराव्या शतकाच्या अखेरीस याची आयात भारतात पोर्तुगीजांनी केलेली. भारतात महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, इ. राज्यांत तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, बीड, औरंगाबाद, अहमदनगर नाशिक, सोलापूर, इ. जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त व हलक्या जमिनीवर या कोरडवाहू फळझाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
सिताफळाचे झाड काटक असून सिताफळाच्या पानामध्ये असणाऱ्या हायड्रोसायानिक आम्ल या द्रव्यामुळे निसर्गामध्ये हे झाड झपाट्याने वाढत असते. सीताफळ हे गोड व थंडावा देणारे फळ आहे. सिताफळ हे चवीला गोड असल्याने या फळांना ग्रामीण शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. सीताफळाच्या पानांचा रस कीटकनाशक म्हणून वापरतात, म्हणून सीताफळावर कीड व रोग येत नाहीत. त्यांना जनावरेही खात नाहीत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज करता येते. बागेच्या कुंपणासाठी किंवा कुंपणाच्या बाजूने या फळझाडाची लागवड करता येते. तसेच, पडीक जमीन, नदीकाठ, शेताचे बांध अशा व्यर्थ जाणाऱ्या जमिनीत या पिकाची लागवड करता येते.

हवामान :
समशितोष्ण कोरड्या प्रदेशातील हे फळपीक आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, सीताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे. साधारणत: ५०० ते ७५० मि. मी. पाऊस पडणार्‍या भागांमध्ये सीताफळाची उत्कृष्ट प्रकारे लागवड करता येते. अति दुष्काळ हानिकारक असतो. उष्ण, कोरडे हवामान आणि मध्यम किंवा कमी थंडी या पिकास मानवते. अति थंड तापमानातसुद्धा हे पीक तग धरू शकते. परंतु अति थंड वातावरणात फळे पिकत नाहीत. झाडावर फुले कोरड्या वातावरणातच येतात. परंतु अति कोरड्या हवामानात परागसिंचनावर विपरीत परिणाम होऊन फळधारणा कमी प्रमाणात होते. मोहोर, फुलोरा येणाऱ्या काळामध्ये कोरडी हवा आवश्यक असते. आर्द्र हवामान सिताफळास चालत नाही. कडक थंडी, धुके व वातावरणामध्ये आर्द्रता खूप वाढली तर या फळझाडांवर किडी व रोगाचा प्रार्दुभाव दिसून येतो. डिसेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी सुप्तावस्थेचा असतो. या काळात पाने झडून वसंत ऋतूत पालवी फुटून फुले येतात.

जमीन :
सीताफळ हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत व्यवस्थित येऊ शकते. त्यामुळे सीताफळाची लागवड डोंगर उतार तसेच उथळ जमिनीतही केलेली दिसून येत्ते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ च्या दरम्यान असावा. सीताफळाची मुळे जमिनीत खोलवर जात नाहीत. ती वरच्या थरातच राहतात. त्यासाठी उत्तम निचरा होणारी हलकी, मुरमाड, मध्यम खोलीची जमीन सीताफळ लागवडीस योग्य असते. शेवाळयुक्त, गाळमिश्रीत, रेताड तसेच लाल जमिनीतही सीताफळाची झाडे निकोपपणे वाढतात. परंतु, जास्त चुनखडी, भारी काळी व पाण्याचा निचरा न होणारी होणाऱ्या जमिनी सीताफळ लागवडीस अयोग्य ठरतात. सीताफळाच्या झाडाभोवती पाणी साचणे अपायकारक असते. जमिनीखालील पाण्याचा ताण झाडे सहन करु शकतात.

जाती :
सीताफळाच्या बाळानगर, अर्का सहान, ऍनोना-२, लाल सीताफळ, वॉशिंग्टन, मेमॉथ, दौलताबाद, टी.पी.-७, धारूर-६, धारूर-३, बार्बाडोस, इ. जातींची लागवड करतात. यापैकी महाराष्ट्रात बाळानगर व अर्का सहान या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
१) बाळानगर – महाराष्ट्रात ही जात अत्यंत लोकप्रिय आहे. या जातीच्या फळांची प्रत चांगली आहे. फळांचे सरासरी वजन ३६० ग्रॅम असून फळामध्ये सरासरी ४० बिया असतात. फळामध्ये बी कमी व गर जादा असतो. गराची चव अतिशय चांगली आहे. गरात साखरेचे प्रमाण साधारण असल्याने टिकाऊपणा जास्त आहे. पूर्वी बाळानगरमध्ये अशा सिताफळांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ‘बाळानगर’ याच नावाने ही जात संबोधली जाते. प्रक्रिया उद्योगामध्ये ह्या वाणाचा गर वापरला जातो. इतर वाणांपेक्षा या सिताफळाला बाजारभाव चांगली मिळतो. या वाणाच्या बियापासून रोपे महाराष्ट्रात १० ते १५ वर्षापासून शासनामार्फत वाटल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बाळानगर वाणाच्याच सिताफळाच्या बागा दिसतात.
२) अर्का सहन – हे सीताफळ गुणवत्तेच्या बाबतीत खूप सरस आहे, यामध्ये गोडपणा जास्त असून त्याचे वजन एक ते दीड किलो आहे. फळामध्ये ब्रिक्स ३२ टक्के आणि साखरेचे प्रमाण २२.८ टक्के एवढे आहे. त्यामधील बिया पण खूपच कमी असून त्याचे वजन फळाच्या वजनाच्या केवळ १० टक्के आहे. या जातीच्या परागीकरणास हाताने परागीकरण करावे लागते. जेणेकरून फळाची वाढ योग्य रीतीने होऊन फळांचे चांगले उत्पादन वाढते तसेच फळांचा आकारही वाढतो, हस्तांतरित परागीकरणामुळे बाजारपेठेत मालाला भावही चांगला आहे. एक मजूर एका तासामध्ये जवळजवळ १५०-२०० फुलांचे परागीकरण करू शकतो. या जातीमध्ये ८ वर्षांमध्ये ४०-४५ किलो उत्पादन एका झाडापासून निघते, त्याचप्रमाणे एकरी १० टन एवढे उत्पादन आहे.
३) ऍनोना-२ – ही जात सीताफळ व चेरिमोया या जातींचा संकर करून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड पुणे येथे विकसित करण्यात आलेली आहे.
४) लाल सिताफळ – या सिताफळाची झाडे कमी उंचीची असून पाने लहान असून मधली शीर जांभळट रंगाची असते. एका झाडापासून ५० ते ७५ फळे मिळतात. फळामध्ये बियांचे प्रमाण जास्त असून गर रंगाने गुलाबी व साधारण चवीचा असतो. फळ बाहेरून लालसर जांभळ्या रंगाचे दिसते.
५) वॉशिग्टन – या वाणाची लागवड महाराष्ट्रात फारच कमी आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशात ह्या वाणाची झाडे पाहायला मिळतात. फळे आकाराने लहान १६५ ग्रॅम वजनाची असतात. गर लोण्यासारखा मऊ, पिवळसर छटा असलेला दिसतो.

अभिवृद्धी :
बियांपासून अभिवृद्धी – सर्वसाधारणतः सीताफळाची अभिवृद्धी बियांपासून करतात. जातिवंत झाडाचे, मोठ्या आकाराचे, परिपूर्ण पिकलेल्या फळामधून काढलेल्या बिया अभिवृद्धीसाठी वापराव्यात. सीताफळाच्या बियाण्याची उगवणक्षमता दोन ते तीन वर्षे चांगली राहते. परंतु फळातून बिया काढल्यानंतर लगेच पेरणी केली तर त्याची उगवण होत नाही. कारण फळातून बिया काढल्यानंतर तीन ते चार महिने त्या सुप्तावस्थेत असतात. बिया पेरणीकरिता कमीत कमी चार महिन्यांत वापराव्यात. पेरणी अगोदर बिया दोन ते तीन दिवस थंड पाण्यात भिजत ठेवाव्यात. त्यामुळे बियाण्याची सुप्तावस्था खंडित होऊन उगवण लवकर होण्यास मदत होते. बिया गादीवाफ्यावर पेरून किंवा पॉलिथिन बॅगमध्ये पेरूनही अभिवृद्धी करता येते. बियापासून लागवड केलेल्या झाडाचे उत्पादन कमी येते आणि वेळही लागतो. यामुळे जास्त करून कलम केलेल्या रोपांची निवड लागवडीसाठी केली जाते.
शाखीय अभिवृद्धी – १) मृदकाष्ठ कलम करण्यासाठी रोपे हे पेन्सिलच्या आकाराची किंवा साधारणतः एक वर्ष वयाची असावीत. सीताफळ व लक्ष्मणफळ या खुंटावर सीताफळाचे कलम करून लावता येते. कलमासाठी जून ते आॅक्टोबर हा कालावधी योग्य असतो. यामध्ये रोपाचा शेंडा कापावा, त्यावर उभा छेद घेऊन कलम काडीला पाचरासारख्या आकारात काप घेऊन खुंट रोपावर घट्ट बसवून पॉलिथिन पेपरने बांधून घ्यावे.
२) डोळे भरणे – सीताफळाची अभिवृद्धी डोळे भरूनसुद्धा करता येते. डोळे भरून अभिवृद्धीमध्ये ७० ते ८० टक्के कलम जगतात.

लागवड :
सीताफळाची लागवड साधारणतः जून-जुलै किंवा पाण्याची व्यवस्था असल्यास जानेवारी – फेब्रुवारीमध्ये करावी. हलक्या जमिनीत ५ x ५ मी. व मध्यम ते भारी जमिनीत ६ x ६ मी. अंतरावर लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी जमिनीत ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे मार्च – एप्रिल महिन्यातच खोदावेत. जून महिन्याच्या सुरवातीस खड्ड्यात तळाशी पालापाचोळा टाकावा. शेणखत, माती, लिंडेन पावडर व एस.एस.पी.ने प्रत्येक खड्डा भरून घ्यावा. पहिला पाऊस पडल्यानंतर त्यात रोपाची लागवड करावी.

अन्न्यद्रव्ये वाय्वास्थापन :
खालील प्रमाणे खतांचे नियोजन करावे.
१) सेंद्रिय खत – १० ते १५ किलो प्रति झाड चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळखत घालावे. मोठ्या झाडांना ५० किलो प्रति झाड याप्रमाणे घालावे.
२) जैविक खते – नत्र स्थिर करणारे जीवाणू – ॲझोटोबॅक्टर – ५० ग्रॅम प्रति झाड. स्फूरद विरघळविणारे जीवाणू – पी.एस.बी – ५० ग्रॅम प्रति झाड. पालाश उपलब्ध करणारे जीवाणू – के. एम. बी. – ५० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे सेंद्रिय खतासोबत द्यावेत.
३) रासायनिक खते – लागवडीच्या पहिल्या वर्षी १० किलो शेणखत ५० ग्रॅम नत्र, २५ ग्रॅम स्फुरद व २५ ग्रॅम पालाश ही खते द्यावीत. दर वर्षी वाढवत जाऊन पाच वर्षे व त्यापुढील वयाच्या झाडांना २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व १२५ ग्रॅम पालाश द्यावे. नत्र दोन समान हफ्त्यांमध्ये विभागून द्यावे.

पाणी व्यवस्थापन :
सीताफळ हे जरी कोरडवाहू फळपीक असले तरी सुद्धा व्यापारी तत्त्वावर भरपूर व उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास तसेच झाडे फुलांवर असताना व परागसिंचन भरपूर होण्यासाठी बागेमध्ये थंडावा ठेवावा लागतो.

paid add

बागेची निगा :
सीताफळाची रोपे लावल्यानंतर काही रोपे मेली असतील तर महिन्याच्या आत त्या जागेवर दुसरे रोप लावावे. तसे शक्य न झाल्यास पुढील वर्षी जून महिन्यापूर्वी नवीन रोप लावावे.
रोपे लहान असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
जमिनीच्या मगदुरानुसार विश्रांतीच्या काळात झाडांना ३५ ते ५५ दिवस पाणी देऊ नये. सर्वसाधारणपणे झाडांची ३५ ते ५० टक्के पानगळ झाल्यानंतर झाडांना विश्रांती मिळाली असे समजावे.वेळोवेळी खुरपणी करून बागेतील तण काढावे. बाग स्वच्छ ठेवावी.झाडाची वाढ जोमाने होण्याकरिता व चांगले फळ मिळण्याकरिता छाटणी करावी.

छाटणी :
या झाडास नियमित छाटणीची गरज नसते, तथापि झाडाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळातच वळण देणे गरजेचे असते; त्यासाठी हलकी छाटणी करावी. छाटणी ही जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात करावी. यामध्ये जमिनीपासून एक मीटर उंचीपासून मुख्य खोडावरील फुटवे काढून टाकावेत. मुख्य खोडावर चार ते पाच मुख्य फांद्या सर्व दिशांना विखुरतील अशा बेताने वाढवून त्यावर दुय्यम फांद्या वाढवाव्यात. फांद्यांची जास्त गर्दी करू नये. वाळलेल्या, रोगट, अनावश्यक व गर्दी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.

पीक संरक्षण :
सीताफळावर सहसा रोग व कीड पडत नाहीत.
कीड – पिठ्या ढेकूण (मिली बग) : ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यांतून रस शोषून घेते. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्यांची आणि फळांची गळ होते. सिताफळाच्या फळांची वाढ होत असताना पृष्ठभागांच्या भेगांमध्ये किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ही कीड फळातील रस शोषून घेते. अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. पावसाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडीच्या अंगावर लोकरी माव्यासारखे पांढरे आवरण असल्याने फवारणी केलेले औषध किडीपर्यंत पोहचत नाही. जून – जुलै महिन्यात या किडीची पिले खोडावरून झाडावर चढतात. अशा वेळी १५ ते २० सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिकची पट्टी घेऊन त्याला ग्रीस लावावे. हि पट्टी ग्रीस वरच्या बाजूला लावून सर्व्ह बाजूंनी बांधून घ्यावी, त्यामुळे खालून वर चढणारे किडे ग्रीसला चिकटून मरून जातात.
रोग – १) सिताफळे कडक पडणे (स्टोन फ्रुटस) : या विकृतीमध्ये सिताफळाच्या फळांची पूर्ण वाढ होत नाही. फळे आकाराने लहान राहतात, कडक होतात आणि त्यांचा रंग काळसर तपकिरी होतो. ही फळे, इतर फळांची काढणी पूर्ण होऊन झाड सुप्तावस्थेत गेल्यानंतरही झाडावर तशीच राहतात. फळवाढीच्या काळात ही फळे अन्नरसासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे अन्नरसाचा तुटवडा भासणाऱ्या फळांमध्ये ही विकृती निर्माण होते.
२) सिताफळे काळी पडणे : सिताफळे ज्यावेळेस कैरीएवढी असतात या काळात जर हवेत आर्द्रता व संततधार पाऊस पडत असेल तेव्हा देठाजवळील खोलगट भागात पाणी साचून तेथील पेशी कुजू लागतात, बुरशी दिसते. याचे प्रमाण वाढत जाऊन सिताफळाचा बराचसा भाग काळा पडतो. प्रथमत: हे तपकिरी डागासारखे दिसून नंतर पूर्ण फळ काळे होऊ लागते. दुसरे कारण म्हणजे जर सिताफळाची बाग भारी काळ्या जमिनीत असेल. पाण्याचा निचर व्यवस्थित होत नसेल तेव्हा, तसेच बागेत स्वच्छता नसल्यास (तण वाढल्यास) हा प्रादुर्भाव होतो.

आंतरपिके :
पिकाच्या लागवडीनंतर सुरवातीची दोन वर्षे बागेत सर्वसाधारणपणे कोणतेही हंगामी पीक घेता येते. परंतु द्विदलवर्गीय पिके घेतल्यास जास्त फायदा होतो. काही प्रमाणात तेलवर्गीय पिके घेतल्यास हेक्टरी नफ्याचे प्रमाण वाढते. सीताफळामध्ये प्रामुख्याने कांदा, काकडी, मूग, चवळी, सोयाबीन, उडीद, मटकी, हरभरा, तीळ, भुईमूग कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. तसेच धैंचासारखी हिरवळीची पिके घेतल्यास तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होते.

काढणी व उत्पादन :
सिताफळाच्या झाडांना जून-जुलैमध्ये फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यापासून फळे तयार होण्यास साधारणपणे ५ महिन्यांचा कालावधी लागतो. फळे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तयार होतात.
सिताफळाच्या कलमी झाडांना लागवडीनंतर चौथ्या वर्षी फळे लागतात, तर बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना लागवडीनंतर सहाव्या वर्षापासून फळे लागतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होतात. दरवर्षी प्रत्येक झाडापासून ११३–२२६ ग्रॅ. वजनाची ६०–७० फळे मिळतात. जसजसे झाडाचे वय वाढते तसतसे उत्पादनही वाढते. सर्वसाधारणपणे ६ ते ७ वर्षे वयाच्या झाडाला १०० ते १५० फळे येतात.
फळे कृत्रिम परागण करुन हे उत्पन्न वाढविता येते. ही झाडे १५–२० वर्षे जगतात.
सिताफळाची योग्य वेळी काढणी करावी. पक्क सिताफळे झाडावर जास्त काळ राहू दिल्यास फळांना तडे पडतात आणि फळे कुजू लागतात. सिताफळाच्या फळांचे डोळे उघडून दोन डोळ्यांमधील भाग पिवळसर रंगाचा दिसू लागल्यावर फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळांची काढणी केल्यानंतर फळे ३-४ दिवसांत नरम पडून खाण्यायोग्य होतात. सिताफळाची फळे नशावंत असल्यामुळे काढणीनंतर जास्त दिवस टिकत नाहीत.

उपयोग :
सिताफळांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असून बर्‍याच पोटदुखीच्या विकारामध्ये या फळांचा उपयोग केल्यास निश्चितच फरक पडतो. सिताफळाच्या झाडांची पाने, साल, मुळ, बियाया सर्वाचाच उपयोग अनेक कारणांसाठी होत असल्याने सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात करणे फायदेशीर आहे. मगजापासून उत्तेजक पेय बनवितात किंवा पक्व फळे तशीच खातात; त्यात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. ती थंड, पौष्टिक, रुचकर व वांतीवर गुणकारी असतात. रक्तशुद्धीसाठी (टॉंनिक) म्हणून तसेच खोकला, सर्दी, पोटाचे विकार, पित्त, हगवण व क्षय रोगांस प्रतिबंधक म्हणून होतो. सिताफळापासून तयार केलेले सिताफळसव या औषधाचे सेवन वर्षभर नियमित केल्यास क्षयरोग व हगवणींचा विकार असलेल्या व्यक्तीस हमखास फरक पडतो. पाने, बियांचे चूर्ण तसेच अपक्व फळांची पूड ढेकूण व इतर कीटकांचा नाश करण्यास आणि बियांच्या चूर्णाचे मलम डोक्यावरील उवा मारण्यास उपयुक्त असते. पानांचा उपयोग मधुमेहाचा विकार असलेल्या व्यक्तिस साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गुणकारी आहे. पानांचे पोटीस गळवे व व्रण यांवर बांधतात; पान चुरुन मिठाबरोबर बांधल्यास पुवाळण्यास मदत होते; नारुवरही पाने चुरुन बांधल्यास तो बाहेर पडतो. स्त्रियांच्या केसातील उवा, लिखा घालविण्यासाठी सिताफळांच्या पानांचा व बियांचा ठेचून केलेला काढा हे प्रभावी उवानाशक महणून सिद्ध झालेले आहे. मुळांचा उपयोग शौचास त्रास किंवा व्यवस्थित होत नसल्यास केला जातो. बी आग करणारे, गर्भपात करणारे व मत्स्यविष आहे; सालीपासून हलक्या प्रतीचा धागा बनवितात. बियांपासून अस्फटिकी अल्कलॉइड, विषारी राळ व तेल मिळते; डोळ्यांच्या पापण्या व बुबुळाचा भाग यांना बियांच्या चूर्णापासून फार आग होते. बियांची पूड चण्याच्या पिठात मिसळून लावल्यास केस स्वच्छ होतात. गुरांच्या जखमांतील कीड मारण्यास बियांची पूड वापरतात. बियांतील तेल (३० टक्के) साबण बनविण्यास उपयुक्त व त्यांची पेंड खतासारखी उपयुक्त असते. सीताफळाची मोठी झाडे जुनी झाले म्हणजे खोडांवरील खरखरीत सालींची आणि वेड्यावाकड्या तानक वाळलेल्या फळांची बारीक पावडर करून ती कातडी कमविण्याच्या व्यवसायात वापरतात. सिताफळांच्या पानांपासून व बियांपासून किफायतशीर नैसर्गिक किटकनाशक तयार करता येईल यावर कृषी विध्यापीठांमध्ये प्रयोग चालू आहेत.

सिताफळाचा आकार हृदयासारखा आणि डोळे व बिया कमी परंतु लांबट, मोठ्या असल्यास अशी सिताफळे जास्त दिवस टिकतात. तसेच गराचे प्रमाण जास्त असून चवीला मधूर, गोड असतात व अशा सिताफळांना ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. ‘गरीबांचा रानमेवा’ म्हणून ओळखले जाणारे हे फळपिक असून देखील सीताफळ लागवडीकडे अद्यापही शास्त्रीय दृष्टीने लक्ष देण्यात आलेले नाही.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम