राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा- अजित पवार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १९ डिसेंबर २०२२ I शेतकरी कर्जाच्या ओझ्याने कोलमडला आहे. त्यामुळे आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून काढायचे असेल तर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

 

पवार यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी जाहीर केले.पवार म्हणाले, ‘यंदा राज्यातला शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीने अनेक भागात पिके वाहून गेली आहेत. शेतजमिनी खरवडून गेल्याने नापिक झाल्या आहेत. पशुधन वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.

 

लांबलेल्या परतीच्या पावसाने हाताशी आलेले पीक हिरावून घेतले आहे. खरिपाबरोबर रब्बीचा हंगाम वाया गेला आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तीळ, मका, उडीद, मूग, तूर, धान, संत्रा पिकांचे झालेलं नुकसान प्रचंड आहे.हवामान खात्याचा पावसाचा अंदाज चुकल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. पीक विम्याचे दावे मोठ्या प्रमाणावर नाकारण्यात आले असून प्रलंबित दाव्यांची संख्याही मोठी आहे.

 

शेतकरी कर्जाच्या ओझ्याने कोलमडला असून दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत जाहीर करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम