केळी, पपई पिकावर अवकाळी पावसाचा परिणाम: खान्देशात रोपांची टंचाई

गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य व मर रोगांचा प्रादुर्भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २१ मे २०२४ | जळगावसह नंदुरबार, धुळे जिल्ह्यात केळी व पपई पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतु, बहुतांश भागात अवकाळी पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे नव्या रोपांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत आणि रोपांची टंचाई निर्माण झाली आहे.

केळीच्या रोपांची किंमत १७ ते २० रुपये, तर पपईच्या रोपांची किंमत १४ ते १७ रुपये प्रति रोप आहे. शेतकऱ्यांनी महागडी रोपे आणून लागवड केली आहे. परंतु, अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य व मर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे झाडे कोरडी पडत आहेत आणि पिवळी होऊन मरत आहेत, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पपईप्रमाणे केळीची रोपे देखील याच प्रकारच्या रोगांना बळी पडत आहेत.

“या” ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात पपई व केळी पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांना आधीच अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, आणि आता या रोगांनी त्यांचे संकट वाढवले आहे. सारंगखेडासह पुसनद, टेंभा, देऊर, खैरवे, कुन्हावद, कौठळ, बिलाडी, ससदे, शेल्टी, बामखेडा परिसरात केळी आणि पपई पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे, परंतु बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

केळी व पपईच्या रोपांची टंचाई

केळी व पपई पिकांवरील मर रोगामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी महागडी रोपे आणून लागवड केली आहे, पण या रोपांचे जगणे अवघड झाले आहे. सर्वच नर्सरीमध्ये केळी व पपईच्या रोपांची टंचाई आहे, त्यामुळे जास्त पैसे मोजून देखील शेतकऱ्यांना रोपे मिळत नाहीत. काही शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या पपईच्या झाडांवर मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसत आहे, ज्यामुळे त्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम