शेततळ्यातील मासेपालन व्यवसाय

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ |  बदलत्या काळात शेतीचे चित्र सुद्धा बदलणे काळाची गरज आहे. दिवसेंदिवस हवामान, पावसाचा कालावधी, पीक पद्धती बदलत आहे. त्यामुळे शाश्वत उत्पन्न देणारा एखादा जोडव्यवसाय करणे गरजेचे आहे. आज आपण अश्याच एका व्यवसायाबद्दल पाहणार आहोत तो म्हणजे शेततळ्यातील मासेपालन व्यवसाय. पूर्वी फक्त समुद्रात किंवा नदीत, ओढ्यात, तलावात मासेपालन केले जायचे. परंतु आता शेततळ्यातील मासेपालन ही संकल्पना रुजत आहे.
शेततळ्यातील मासेपालन का करावे ?

हा जोडधंदा कुठेही आणि कितीही जागेत अगदी सहज शक्य आहे.
बारमाही रोजगार हमी देणारा व्यवसायरोजगाराबरोबरच माश्यां च्या रूपाने पौष्टिक आहार सुद्धा मिळते.
मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळी परिस्थितीत हा व्यवसाय वरदान राहील कारण शेततळ्याचे पाणी पिकांना देता येते आणि मासेपालन सुद्धा होते.
शेततळे बांधणी करण्यासाठी सरकारद्वारे अनुदान मिळते.

माशांच्या जाती कश्या पद्धतीने निवडाव्यात ?

बाजारात चांगली मागणी असणारे आणि अधिक भाव असणारे मासे निवडावेत.
मासळीचे प्रजनन शक्यतो तळ्यातच व्हावे.
पाण्याचा वेगवेगळ्या थरात राहणारे मासे असावेत.
मासळीची वाढ जलद आणि आकार मोठा असावा.
उपलब्ध सर्व अन्नद्रव्याचा वापर करणारी जातीचे मासे पाळावेत.
मासळीची जात मत्स्यभक्षक नसावी.एकमेकात स्पर्धा न करणारे किंवा एकमेकांना हानी न पोहोचविणारे मासे असावेत.
नैसर्गिक खाद्यावर जगणारे आणि कृत्रिम खाद्य सहज स्वीकारणारे मासे पाळावे.

लोकप्रिय मासे :-

रोहू
कटला
मृगळ
तीलापिया
सायप्रिनास
चंदेरी इत्यादी.

 

शेततळे रचना कशी असावी ?

शेततळ्यातील पॉलीथिन किंवा सिल्पोलीन लायनिंग असणे गरजेचे आहे. हे असल्याने तळ्यात बारमाही पाणी राहते तसेच याची जाडी ५०० मायक्रोन असावी.
२० ते ४० गुंठे क्षेत्रावर तळे असल्यास उत्तम.
तळ्यातून पाणी आत बाहेर येण्यासाठी असणाऱ्या पाईपचे तोंडावर जाळी बसवावी. शेततल्याभोवती जाळीचे कुंपण करणे. यामुळे जनावरे, साप, बेडूक, लहान मुले, अनोळखी व्यक्ती तळ्या जवळ येऊ शकत नाही.
तळ्याच्या वरती बारीक जाळी बसवावी यामुळे माश्याचे पक्ष्यापासुन संरक्षण होते.
पावसाळ्यात तळे भरून वाहू लागले तर मासे बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

 

मत्स्यबीज कोठून विकत घ्यावे ?

शासकीय मत्स्यबीज केंद्र
जिल्हा मत्स्यविभाग
अनुभवी आणि कुशल मत्स्यबीज उत्पादन करणारे शेतकरी

मत्स्यबीज विकत घेताना काय काळजी घ्यावी ?

मत्स्यबीज म्हणजे स्पोन हे ३ दिवसांचे असावे.
बीज हे निरोगी आणि चपळ असावे.

 

मासेपालन पूर्व तयारी : –

मत्स्यबीज तलावात किंवा शेततळ्यात सोडण्यापूर्वी तलावाची / शेततळ्याची चांगली स्वच्छता करून घ्यावी.
पाणवनस्पती हाताने, जाळी लावून, काटेरी किंवा हुकणे ओढून काढून टाकावी.
हंगामी शेततळी रिकामी झाल्यावर त्यात एक फुटापर्यंत पाणी भरून १००० किलो शेणखत त्यात टाकावे.

दोन दिवसांनी पाण्याची पातळी १ मीटर पर्यंत वाढलेली दिसेल.
हानिकारक, निकृष्ट दर्जाचे मासे तलावातून काढून टाकावेत.
मोहाची ढेप, ब्लिचिंग पावडर सारखे गोष्टी वापरून आपण हानिकारक माश्याचे निर्मूलन करू शकता.

ही स्वच्छता मत्स्यबीज सोडण्यापूर्वी १५ ते २० दिवस अगोदर करावी.

तळ्यात चुना वापरणे :-

मासेपालणात पाण्याचा सामू नियमित राखणे खूप गरजेचे असते.
पाण्याचा सामू ७ च्या खाली असेल तेव्हा ८० किलो चुनखडी प्रती एकर पाण्यात मिसळावे.
चुण्यामुळे पाण्यातील जैविक घटक चुन्याने मोकळे झाल्याने प्लवंग वाढ खूप होते.
पाण्याचा सामू वाढविण्यास आणि योग्य राखण्यास मदत होते.मत्स्यबीज रोगाला बळी पडत नाही.

मासेपालन व्यवसाय: –

शेततळ्यातील मासेपालन व्यवसाय तीन टप्प्यात करता येतो.
खाण्यायोग्य मोठे मासे तयार करणे.
मत्स्यबीज तयार करणे.
मत्स्यबोटुकली बनविणे.

 

1. खाण्यायोग्य मोठे मासे तयार करणे.

या टप्प्यात खाद्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. किंबहुना खाद्य किती आणि कसे देता यावरच व्यवसायाचे नफ्याचे गणित अवलंबून असते.
प्रथिने, मेदाम्ले, कर्बोदके, मिनरल, जीवनसत्वे परिपूर्ण आहार माश्यांना नियमित स्वरूपात देणे आवश्यक आहे.
आज बाजारात अनेक नामवंत कंपनी फिश फूड तयार करतात.
मत्स्य सल्लागार, मत्स्य अधिकारी यांचा वेळोवेळी सल्ला घेणे.कंपनी प्रतिनिधी आपल्या मासळीची तपासणी करून योग्य आहार नियोजन बनवून देतात. त्याप्रमाणे आहार दिल्यास मासे अगदी सहज वाढतात.
घरगुती खाद्यामध्ये सोयाबीन वडी / शेंगदाणा पेंड / मक्का आणि तांदळाची कणी यांचे समप्रमाणात मिश्रण करून पेस्ट बनवावी ती रात्री भिजवत ठेवावी.
रात्री भिजवत ठेवलेले हे खाद्य सकाळी आणि संध्याकाळी अश्या दोन टप्प्यात माश्यांना द्यावे.मासळीच्या वजनाच्या ८ ते १० % पर्यंत खाद्य द्यावे.

 

2. मत्स्यबीज तयार करणे.

मत्स्यबीज संवर्धन करताना खाद्य आणि खते व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
नैसर्गिक खाद्य तलावात तयार व्हावे म्हणून शेंगदाणा ढेप, एस एस पी, ताजे शेण आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण बनवून त्याचे ३ भाग पाडावे.
१ भाग मत्स्यबीज सोडण्यापूर्वी ४८ तास अगोदर तलावात सोडावा. उर्वरित दुसरा भाग एका आठवड्यांनी तर तिसरा भाग दोन आठवड्यांनी तलावात सोडावा.
मत्स्यबीज संचयन करताना सिमेंट टाकी आणि जमिनीवरील नर्सरी यात करतात.
मत्स्यबीज संचयन केल्यावर पहिल्या दिवशी कोणतेही अन्न देऊ नये.
दुसऱ्या दिवशीपासून खाद्य देण्यास सुरुवात करावी.कंपनी मेड किंवा घरी बनविलेले खाद्य देऊ शकता.

सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळेस खाद्य देणे गरजेचे आहे.
खाद्याचे प्रमाण दरदिवशी थोडे थोडे वाढवत जावे.
योग्य नियोजन केल्यास १५ ते २० दिवसात आपल्या मत्स्यबीज आकार २० ते २५ मिमी होतो.

बाजारात उपलब्ध असलेल्या बारीक जाळीने हे मत्स्यबीज पकडून आपण नवीन मासेपालक शेतकरी बांधवाना विकू शकता.
कमी कालावधीत योग्य नियोजन करून भरपूर नफा देणारा हा टप्पा आहे.

3. मत्स्य बोटुकली बनविणे.

मत्स्यबीज पासून बोटुकली बनविणे हा टप्पा अधिक संवेदनशील असतो.
१ लाख प्रती एकरी मत्स्यबीज बोटुकली बनविण्यासाठी सोडावे.
प्रत्येक पंधरवडा त्यांची तपासणी करून आहार आणि आरोग्य नियोजन करावे.
ढगाळ वातावरण असल्यास त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.
सल्लागार यांचा सल्ल्याने खाद्य प्रमाण आणि नियोजन बनवावे.
मत्स्यबीज संचयन केल्यावर दर आठवड्याला दीड ते दोन क्विंटल शेणखत आणि शिफारशीप्रमाणे युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट टाकावेत.
पाण्याचा सामू आणि अमोनिया वेळोवेळी चेक करावा. आणि प्रमाण कमी जास्त झाल्यास ताबडतोब त्यावर उपाय करावेत.
मत्स्य अधिकारी, मत्स्यव्यवसाय सल्लागार यांची वेळोवेळी मार्गदर्शन घेत राहावे.

सरासरी ६० ते ७५ दिवसांत बोटूकली ७५ ते ८० मिमी होते.
बाजारात त्यांची किंमत आकारानुसार ठरते.

मासेपालनातील अर्थकारण :-

योग्य आहार नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन ही या व्यवसायाची यशाची सुत्री आहे.
भांडवल हे काही हजारापासून काही लाखापर्यंत लागू शकते.
भांडवल हे तलावाचे क्षेत्रफळ, पाण्याची गुणवत्ता, व्यवस्थापन, हवामान आणि अनुभव यानुसार लागू शकते.
बाकीच्या शेतीपूरक व्यवसायापेक्षा यात जास्त उत्पन्न राहते हे नक्की.

 

विशेष बाब –

महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना मत्स्य विकासासाठी कार्यरत आहेत. पशु व मत्स्य विद्यापीठ, नागपूर आणि मत्स्याविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत मत्स्य विकास आणि संवर्धन करण्याकरिता विविध कार्यशाळा, ट्रेनिंग, प्रदर्शन, वेबीनार आयोजित केले जातात.
मत्स्यविकास अधिकारी, मत्स्य सल्लागार, कंपनी प्रतिनिधी यांचा वेळोवेळी सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम