कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी नियम व अटी

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ नोव्हेंबर २०२२ | शेतीची मशागत करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे कृषी इनपुट म्हणजे बी बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी. हे सर्व मिळण्याचे ठिकाण म्हणजे कृषी सेवा केंद्र होय. चला तर आज पाहुयात, कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी कोणते नियम व अटी आहेत.

विशेष बाब –

हा ग्रामीण भागात सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणारा व्यवसाय आहे.
उच्चशिक्षित तरुणाना ग्रामीण भागात स्वतः चे यशस्वी स्टार्ट अप उभारण्याची संधी यामुळे आहे.
उत्तम सेवा, योग्य कृषी सल्ला आणि फील्ड व्हीसिट या त्रिसूत्रीचा वापर केल्याने आपला व्यवसाय खूप यशस्वी होईल.

 

प्राथमिक बाबी –

कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी उत्तम लोकेशन असणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत अश्या ठिकाणी आपले केंद्र सुरू करावे.
चांगला जनसंपर्क, उत्कृष्ट संवाद कौशल्य, भरपूर ज्ञान या प्राथमिक बाबी खूप गरजेच्या आहेत.

कृषी सेवा केंद्र सुरू करण्याकरिता अर्ज कोठे करावा ?

महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईट वर जाऊन संपूर्ण फॉर्म भरावा.
याच वेबसाईट वर ऑनलाईन फीस सुद्धा भरावी लागते.
आपल्या जवळील सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार केंद्र येथे सुद्धा हा फॉर्म भरून मिळतो.

 

अर्जदाराची शैक्षणिक पात्रता –

हा अर्ज करणारा व्यक्ती कृषी पदवीका, कृषी पदवी ( सर्व शाखा ), रसायनशास्त्र विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.
कृषी पदवी मध्ये सर्व ८ पदव्याना समान दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे सर्व कृषी पदवीधर यासाठी पात्र आहेत.

 

आवश्यक कागदपत्रे –

ऑनलाईन फॉर्म
ऑनलाईन चलन प्रिंट
आपले शैक्षणिक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक झेरॉक्स
जागेचा उतारा आणि नकाशा
ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत कडून मिळालेले ना हरकत प्रमाणपत्र
जागा किरायाने असल्यास त्या जागेचे भाडे करार पुरावा
चारित्र्य प्रमाणपत्र
ज्या कंपनीचा प्रॉडक्ट आपण विक्री करणार आहोत त्या कंपनीकडून मिळालेले प्रिनसिपॉल सर्टिफिकेट
वेळोवेळी यामध्ये काही बदल होऊ शकतात याची काळजी घ्यावी.

 

कागदपत्रे कोठे जमा करावीत ?

सर्व कागदपत्रे आणि ऑनलाईन फॉर्म आणि त्यांची एक झेरॉक्स प्रत तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे जमा करावी.

 

किती परवाने लागतात ?

कृषी सेवा केंद्र चालकाकडे बियाणे विक्री परवाना, खते विक्री परवाना, कीटकनाशके विक्री परवाना असे तिन्ही वेगवेगळे परवाने असणे आवश्यक आहे.
सर्व परवाने काढण्यासाठी ऑनलाईन फॉर्म मध्ये अर्ज करावा. तसेच तिन्हीसाठी ऑनलाईन पद्धतीने स्वतंत्र फिस भरावी लागते.

 

फी किती आहे ?

नवीन बियाणे परवाना १०००/- रुपये
नवीन खते विक्री परवाना मिळविण्यासाठी रीटेलर ४५०/- रुपये & होलसेलर २२५०/- रुपये
नवीन कीटकनाशके विक्री परवाना ७५००/- रुपये

 

परवाना नूतनीकरण फी किती आहे ?

बियाणे परवाना दर पाच वर्षांनी नुतनीकरण करावा लागतो. यासाठी १०००/- फीस लागते.
खते परवाना दर पाच वर्षांनी नुतनीकरण करणे गरजेचे आहे. त्याकरिता होलसेल विक्रेत्यांना २२५०/- तर रीटेलर विक्रेत्यांना ४५०/- फीस भरावी लागते.
कीटकनाशक विक्री परवाना नूतनीकरण करण्याची गरज नाही.

 

अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय येथे चौकशी करावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम