कृषी सेवक | २४ एप्रिल २०२४ | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अधिक आनंदाची आणि खास ठरणार आहे. खरंतर पीएम किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली केंद्राची एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना केंद्रीय पुरस्कृत आहे. याची सुरुवात २०१९ मध्ये झाली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ६००० रुपयाचा लाभ दिला जात आहे.
दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे एका आर्थिक वर्षात तीन हप्ते दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. पीएम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. शेतकऱ्यांना आता आगामी सतराव्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे. खरंतर पीएम किसान योजनेची लोकप्रियता पाहता राज्यात वर्तमान शिंदे सरकारने या योजनेच्या धर्तीवर नवीन नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.
नमो शेतकरी योजनेचे स्वरूप हे पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे. विशेष म्हणजे जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र ठरतात त्यांनाच नमो शेतकरीचा लाभ मिळतो. अर्थातच महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे सहा हजार रुपये मिळत आहेत त्यांना नमो शेतकरीचे देखील ६००० दिले जात आहेत. या नमो शेतकरी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण तीन हप्ते दिले गेले आहेत. आता नमो शेतकरीचा चौथा केव्हा मिळणार हा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
खरेतर पीएम किसान योजनेचा मागील सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबतच दिला गेला. म्हणजेच पीएम किसान योजनेच्या मागील सोळाव्या हपत्यासोबत राज्यातील शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपयांचा लाभ मिळाला. आता नमो शेतकरीचा चौथा हप्ता देखील हा पीएम किसान योजनेच्या पुढील सतराव्या हप्त्यासोबतच दिला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हा जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो. म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच पीएम किसानचे २००० आणि नमो शेतकरीचे २००० असे एकूण ४००० रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार असा अंदाज आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम