अमरावती: अमरावती जिल्ह्यातील २.७६ लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, अजूनही सहा हजार शेतकऱ्यांनी बँक खाते आधार लिंक आणि ई-केवायसी केलेली नाही. या योजनेचा १७ वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे आणि यासाठी १५ जूनपर्यंत डेडलाइन देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
केंद्राच्या निर्देशानुसार ५ ते १५ जून दरम्यान शेतकऱ्यांनी लागवडीलायक क्षेत्राचा पुरावा, बँक खाते आधार संलग्न करणे आणि ई-केवायसी करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. यासाठी राज्यातील सर्व सीएससी सेंटर आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला सूचित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितले आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी तीन महत्त्वाच्या बाबी
१. शेतजमिनीचा तपशील भूमी अभिलेख नोंदीनुसार अद्ययावत करणे.
२. बँक खाते आधार संलग्न करणे.
३. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे.
शेतकऱ्यांनी यंत्रणेला सहकार्य करावे
पुढील १७ वा हप्ता जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी, ई-केवायसी आणि बँक खाती आधार क्रमांकास जोडण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागेल.
जमिनीचे अद्ययावत अभिलेख नसलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधावा आणि ई-केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटर्स किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करावी.
शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक
जिल्हा अधीक्षक राहुल सातपुते यांनी शेतकऱ्यांना या मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला त्वरित प्रतिसाद देऊन आपला हक्काचा लाभ सुनिश्चित करावा.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम