दूध देणाऱ्या जनावरांमध्ये आढळणारा दुग्धज्वर आजार

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ५ डिसेंबर २०२२ I उच्च दूध उत्पादन आणि आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे उत्पादकतेशी निगडित दुधाळ जनावरांमध्ये (Animal) विविध चयापचयाचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे दुग्धज्वर. हा आजार प्रामुख्याने जास्त दूध (Milk) देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो. आजाराचा प्रादुर्भाव साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळून येतो. गाभण काळातील शेवटचा टप्पा व व्यायल्यानंतर जास्त दूध उत्पादनाचा काळ यामध्ये दुधाळ जनावरांची निगा, आरोग्य, आहार व व्यवस्थापन योग्यप्रकारे न करणे हे चयापचय आजार होण्यामागचे मुख्य कारण आहे.

दुभत्या जनावरांमध्ये तिसऱ्या ते पाचव्या वेतामध्ये आजार दिसतो. पहिल्या किंवा दुसऱ्या वेतामध्ये जनावराची चाऱ्यातील क्षार शोषण्याची क्षमता तसेच हाडांमध्ये असलेले जास्त कॅल्शिअमचे प्रमाण यामुळे आजार होण्याचा धोका फार कमी असतो. आजार मुख्यत्वे संकरित गाई (५ ते ७ टक्के) आणि म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. रक्तातील कॅल्शिअम कमतरतेमुळे आजार होतो. प्रसूतीनंतर दूध देण्याचा कालावधी तसेच चीक आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअमची मागणी शरीराच्या कॅल्शिअम पुरवठा करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असते, तेव्हा आजार दिसतो.

गाय आणि म्हैस व्यायल्यानंतर ४८ ते ७२ तासांच्या आत अचानक कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. व्यायल्यानंतर १ ते ३ दिवसांत आजाराची लक्षणे दिसतात. जनावर अस्वस्थता आणि अशक्तपणा येऊन खाली बसते. दुधाळ गायी, म्हशींमध्ये कॅल्शिअमची सामान्य पातळी ८-१२ मिलि/डीएल असते. जेव्हा ही पातळी ५.५ मिलि/डीएल पेक्षा कमी होते, तेव्हा आजाराची लक्षणे दिसतात. शरीरातील उर्वरित कॅल्शिअम स्नायूंमधून वापरले जाते. यामुळे शेवटी पक्षाघात आणि मज्जासंस्थेच्या अति उत्तेजनाची लक्षणे दिसून येतात.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम