नाशिक आणि दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा निर्णायक आवाज

बातमी शेअर करा

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष निवडणुकीच्या निकालांमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे.

देशभर लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. महाराष्ट्रातील नाशिक आणि दिंडोरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांत सत्ताधारी पक्षाचा पराभव निश्चित मानला जात आहे. नाशिक जिल्हा कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. लाखो शेतकरी कांद्याचे उत्पादन करतात. गेल्या काही महिन्यांपासून कांद्यावरून राजकारण पेटले होते. डिसेंबरमध्ये केलेली निर्यात बंदी आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा आक्रोश यामुळे परिस्थिती गंभीर झाली.

नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून सत्ताधारी पक्षातील उमेदवार निवडून येऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली असली तरी निर्यात शुल्क कायम राहिल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष निवडणुकीत मतपेट्यांमधून व्यक्त झाला आहे.

शेतकरी विरोधी भाजप सरकारच्या धोरणांच्या विरोधात शेतकऱ्यांनी मतदान केले आहे. कांदा निर्यातबंदी, निर्यात शुल्क वाढवणे यासारख्या निर्णयांचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील शेतकऱ्यांचे संघटन व एकजूट पाहता भविष्यात कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांच्या हिताची दखल घेणे गरजेचे ठरणार आहे.

संजय साठे, कांदा उत्पादक शेतकरी म्हणतात की, “शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविल्या गेल्या नाहीत की त्यांचा रोष मतदानातून व्यक्त होतो. नाशिक व दिंडोरी या मतदारसंघाचा कौल हेच दर्शवितो.”

अँड. रामनाथ शिंदे, संचालक – महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ नाशिक विभाग म्हणतात, “नवीन सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी नाशिक-दिंडोरीचा निकाल एक माईलस्टोन ठरावा.”

भगवान बोऱ्हाडे, अध्यक्ष, शेतकरी संघटना समन्वय समिती यांनी नमूद केले की, “शेतकऱ्यांनी सरकारला मतपेटीच्या माध्यमातून इशारा दिला आहे.”

भारत दिघोळे, अध्यक्ष – महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना म्हणतात की, “केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतपेटीतून आपला रोष व्यक्त केला आहे.”

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम