विरोधी पक्षनेते दानवे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २ डिसेंबर २०२२ I शेतकर्‍यांची वीज तोडण्याचा लेखी आदेश तुझ्याकडे आहे का? राज्य सरकारने काढलेले परिपत्रक तू वाचले का? वीज तोडण्याआधी आधी नोटीस द्यावी लागते, हे तुला मान्य आहे ना? मग अशी नोटीस तू का दिली नाही? तुझ्यावर 302 अन्वये गुन्हा का दाखल करू नये?..अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महावितरणचे सहायक अभियंता भराट यांना धारेवर धरले.

तसेच भराट यांचे वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता कोपनर यांनाही फोनवरून सुनावताना, मी येथे अर्धा तासापासून बसलोय, तुम्हाला जिल्हाधिकार्‍यांनी माझा दौरा दिला नव्हता का ? नेमकी अकोळनेरचीच वीज का तोडली, असे सवालही केले. दरम्यान, जाधव परिवाराला दिलासा देताना मुलांच्या शिक्षणासह सर्व अडचणी सोडवण्याची ग्वाही दिली व पुन्हा तुमच्या घरी येण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

अकोळनेर येथील पोपट जाधव या शेतकर्‍याने पाणी असूनही वीज नसल्याने शेतातील कांदा पिकाला पाणी देता येत नाही, या दुःखातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. त्यांच्या कुटुंबाची भेट दानवे यांनी गुरुवारी दुपारी घेतली. यावेळी शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे व अन्य यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम