पिकस्‍पर्धा रब्‍बी हंगाम -2022

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २२ डिसेंबर २०२२ I पिकस्पर्धेबाबत यापुर्वीचा दि.5 ऑक्‍टोबर 2020 चा शासन निर्णय अधिक्रमीत करून सन 2022-23 पासुन पिकस्‍पर्धेमध्‍ये आवश्‍यक बदल करुन शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात आला आहे. रब्‍बी हंगाम -2022 पासून पिकस्‍पर्धा तालुका, जिल्‍हा व राज्य पातळीवर राबविण्‍यात येणार आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

1) पीकस्पर्धेतील पीके :

● रब्बी पीके- ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस (एकूण 05 पिके)

पीकस्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र 1000 हेक्टर पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची विहीत मार्गाने लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

2) स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या –

 पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली भात पिकासाठी किमान 20 आर व इतर पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

3) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क :

 सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम रु.300 राहील. तालुकास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी सर्वसाधारण गटासाठी किमान 10 व आदिवासी गटासाठी किमान 05 यापेक्षा प्रवेश अर्ज कमी असल्यास, पिकस्पर्धा रद्द करण्यात येऊन प्रवेश शुल्क परत देण्यांत येईल.

4) अर्ज दाखल करण्याची तारीख:

रब्‍बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहिल.

 ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस – 31 डिसेंबर अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्‍या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास , त्‍यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्‍यात यावी. तालुकास्तर,जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

 या पद्धतीने पिकस्पर्धा घ्यावयाचे हे प्रथम वर्ष असल्याने प्रथम फक्त तालुकास्तरीय व जिल्‍हास्‍तरीय पीकस्पर्धा घेण्यात येईल.

राज्‍यपातळीवरील पिकस्‍पर्धा चालुवर्षी होणार नाहीत. मागील वर्षाच्‍या तालुकास्‍तरीय स्‍पर्धेतील पिकनिहाय पहिल्‍या तीन क्रमांकाच्‍या विजेत्‍या शेतक-यांनी जिल्‍हास्‍तरीय पिकस्‍पर्धेमध्‍ये सहभाग घ्‍यावा.

5) बक्षिस स्वरुप – सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये

1) स्पर्धा – तालुका पातळी – पहिले बक्षिस पाच हजार रुपये , दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस –दोन हजार रुपये,

2) जिल्हा पातळी – पहिले बक्षिस – दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस – सात हजार रुपये, तिसरे बक्षिस – पाच हजार रुपये ,

3) राज्य पातळी – पहिले बक्षिस – पन्नास हजार रुपये, दुसरे बक्षिस – चाळीस हजार रुपये, तिसरे बक्षिस – तीस हजार रुपये ,

रब्बी हंगाम – दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे, ही बाब विचारात घेऊन पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्‍हावे. असे आवाहन कृषि आयुक्‍तालयामार्फत करण्‍यात येत आहे. कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,पुणे विकास पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम