सरकी बियाण्याचे दर वाढले: शेतकऱ्यांना द्यावे लागणार ८६४ रुपये

चढ्या भावाने बियाणे विक्री केल्यास कारवाई

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २२ मे २०२४ | सरकारच्या नियंत्रणातील बीटी कापूस बियाणांच्या दरात यंदा १३ रुपये प्रतिपाकीट वाढ झाली आहे. त्यामुळे बीटी कॉटन सीडच्या एका पाकिटासाठी शेतकऱ्यांना आता ८६४ रुपये मोजावे लागतील. या वाढीमुळे बियाणे कंपन्यांच्या तिजोरीत सुमारे ५ कोटी ४६ लाख रुपयांची भर पडणार आहे.

महाराष्ट्र हवामान अपडेट: चक्राकार वाऱ्यांची स्थिती, मोसमी पावसाची आतुरता

कापसाची लागवड आणि मागणी

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत ९ लाख ८३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रासाठी सुमारे ४२ लाख सरकी बियाणे पाकिटांची आवश्यकता आहे. कृषी विभागाने सीड कंपन्यांकडे सरकी पाकिटांची आगाऊ मागणी नोंदविली आहे, ज्यामुळे बाजारात मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार आहेत.

बियाणे विक्रीसाठी नियमावली

कृषी विभागाकडून सरकी बियाणांची सुमारे ४२ लाख पाकिटे बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत. प्रत्येक पाकिटाचा दर ८६४ रुपये निश्चित केला असून, कोणत्याही व्यापाऱ्याने चढ्या दराने बियाणे विक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले आहे.

कपाशीची लागवड: महत्त्वाच्या सूचना

सरकी बियाणे विक्रीवरील बंदी यावर्षी उठवली आहे, त्यामुळे व्यापारी आता शेतकऱ्यांना बियाणांची विक्री करू शकतात. परंतु, ३० मेपूर्वी कपाशीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना मनाई आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे निर्देश आहेत.

कपाशीचे पीक शेतात सात महिने उभे ठेवल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव दुप्पट होतो. कपाशीची लागवड मेमध्ये केल्यास अळीच्या पुनरुत्पादन साखळीला जीवदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना १ जूननंतरच कपाशीची लागवड करण्यास परवानगी आहे.

यशोगाथा : आठवी पास शेतकऱ्याची यशस्वी आंबा शेती; वर्षाला कमावतो लाखो रुपये!

बियाणे विक्रीला परवानगी

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्यावर्षी ३० मेपर्यंत सरकी बियाणे विक्रीस मनाई होती. यंदा शासनाने बंदी उठवली असून व्यापारी बियाणे विक्री करू शकतात, पण शेतकऱ्यांना १ जूननंतरच सरकीची लागवड करण्यास परवानगी आहे, असे विभागीय गुणनियंत्रण अधिकारी अंकुश काळुसे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम