कृषी सेवक | ७ एप्रिल २०२४ | मार्च महिना संपला आहे. आता फक्त काही दिवसातच महाराष्ट्र राज्यात गाळप सुरु राहणार आहे. या मध्येच यावर्षीच्या गाळप हंगामातील एकूण २९ हजार ६९६ कोटीची रक्कम राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली असून यावर्षी राज्यात एफआरपीनुसार एकूण ३१ हजार ५१० कोटी रुपयांच्या उसाचे गाळप झाले आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या उसाचे एकूण ९४.२४ टक्के थकबाकीची रक्कम मिळाली आहे. असे राज्याच्या साखर आयुक्तालयाच्या माहितीतून समोर आले आहे.
साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, “राज्यातील शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून आणखी १ हजार ८१४ कोटी रुपयांची थकबाकी मिळणे बाकी आहे. यंदा महाराष्ट्रात हंगामाच्या सुरुवातीला २०७ कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. यातील जवळपास ११० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची सर्व रक्कम चुकती केली आहे. तर ५२ साखर कारखान्यांनी ८० ते ९९ % रक्कम शेतकऱ्यांना दिली. याशिवाय २९ कारखान्यांनी शेतकऱ्यांना आपल्या एकूण रकमेपैकी ६० ते ७९ % रक्कम अदा केली आहे. तर १५ कारखान्यांनी ० ते ५९ % या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी चुकती केली आहे.”
यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक आर्थिक मार्ग यंदा काहीसे ठप्प असल्याचे पाहायला मिळाले. ऊस या बारमाही पिकाला अधिकचे पाणी लागते. परंतु, यंदा कमी पाऊस असून देखील महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्राला साखर उत्पादनात सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवले आहे. अशातच आता महाराष्ट्रातील जवळपास ९६ साखर कारखान्यांकडे अजून शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम शिल्लक आहे. खरीप हंगाम तोंडावर येऊन आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून पुढील वर्षीच्या भांडवलासाठी कारखान्यांकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे बाकीच्या कारखान्यांनी शेतकऱयांना त्यांची थकबाकी वेळेत द्यावी, असे साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम